पुलाची शिरोली प्रतिनिधी कुबेर हंकारे
पुलाची शिरोली येथे आयोजित करण्यात आलेल्या “कबड्डी महासंग्राम २०२६” स्पर्धेचा अंतिम सामना अत्यंत रंगतदार वातावरणात पार पडला. प्रेक्षकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात झालेल्या या थरारक अंतिम लढतीत थ्री वॉरियर्स संघाने दमदार खेळ करत शिवमुद्रा रोहिदास संघावर २९-२३ अशी मात करून विजेतेपद पटकावले. सुरुवातीपासूनच दोन्ही संघांनी आक्रमक खेळाचे प्रदर्शन करत सामना चुरशीचा केला. मात्र निर्णायक क्षणी थ्री वॉरियर्सच्या खेळाडूंनी अचूक चढाया व भक्कम पकडी करत विजयावर शिक्कामोर्तब केले.अंतिम सामन्यात थ्री वॉरियर्सच्या खेळाडूंनी उत्कृष्ट समन्वय राखत आक्रमण आणि बचाव या दोन्ही विभागांत वर्चस्व राखले. शिवमुद्रा रोहिदास संघाने देखील शेवटपर्यंत जोरदार झुंज दिली. सामन्याच्या मध्यंतरापर्यंत दोन्ही संघांमध्ये काट्याची टक्कर पाहायला मिळाली. मात्र उत्तरार्धात थ्री वॉरियर्सच्या खेळाडूंनी वेगवान चढाया करत गुणांची आघाडी घेतली आणि विजेतेपद आपल्या नावावर केले.स्पर्धेत शिवमुद्रा रोहिदास संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. तर तिसरा क्रमांक शिव-साई इलेक्ट्रिकल्स नागाव संघाने पटकावला. आर आर किंग संघाने चतुर्थ क्रमांक मिळवला. स्पर्धेतील सर्व संघांनी दर्जेदार खेळाचे प्रदर्शन करत प्रेक्षकांची मने जिंकली.स्पर्धेनंतर विविध वैयक्तिक पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. शिवमुद्रा रोहिदास संघाचा निखिल बरगे याला “सर्वोत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू” पुरस्कार देण्यात आला. त्याने संपूर्ण स्पर्धेत चढाई आणि पकड या दोन्ही विभागांत उल्लेखनीय कामगिरी केली. थ्री वॉरियर्सचा निरंजन पाटील याने “सर्वोत्कृष्ट चढाई” पुरस्कार पटकावला. त्याच्या वेगवान आणि अचूक चढायांनी अंतिम सामन्यात संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. तर सौरभ धनगर याला “सर्वोत्कृष्ट पकड” पुरस्काराने गौरविण्यात आले. तिसऱ्या दिवसाचा “मॅन ऑफ द डे” पुरस्कार अनंत सोडगे याला प्रदान करण्यात आला.या अंतिम सामन्यास आणि बक्षीस वितरण समारंभास विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली. यावेळी धीरज पाटील, निखिल पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य महेश चव्हाण, उपसरपंच सुरेश यादव, उद्योजक संतोष बाटे, नितीन चव्हाण, भाजप तालुका ओबीसी अध्यक्ष अर्जुन चौगुले, संदीप तानवडे, सलीम महात, ग्रामपंचायत सदस्य महादेव सुतार, उपसरपंच विजय जाधव, उद्योजक उदय खटाळे, शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सपोनि सुनील गायकवाड, धनंजय हरि पाटील, संजय पाटील, तंटामुक्त समिती अध्यक्ष सतीश पाटील, कुमार पाटील, राजेश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमात प्रमुख पाहुण्यांचे स्वागत उत्साहात करण्यात आले. स्पर्धेचे प्रमुख स्पर्धा कमिटी अध्यक्ष संभाजी भोसले यांनी उपस्थितांचे आभार मानले. तसेच या भव्य स्पर्धेचे नियोजन अशितोष मोठे आणि अमर जाधव यांनी यशस्वीरीत्या पार पाडले. संपूर्ण स्पर्धेदरम्यान खेळाडू, आयोजक आणि प्रेक्षकांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला.कबड्डी महासंग्राम २०२६ स्पर्धेमुळे परिसरातील कबड्डीप्रेमींना दर्जेदार सामने अनुभवायला मिळाले. ग्रामीण भागातील युवा खेळाडूंना व्यासपीठ उपलब्ध करून देत या स्पर्धेने क्रीडा क्षेत्रात नवचैतन्य निर्माण केले असल्याची भावना उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली.