पुलाची शिरोली प्रतिनिधी कुबेर हंकारे
पुलाची शिरोली, ता. हातकणंगले येथील सर्वेश्वर कला, क्रीडा व सांस्कृतिक तरुण मंडळाच्या वतीने आयोजित ७० किलो वजनी गटाच्या ‘महासंग्राम’ लीग कबड्डी स्पर्धेचा थरार छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर अत्यंत उत्साहात सुरू झाला आहे. कोल्हापूर जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने रंगणाऱ्या या स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी सिद्धांत वॉर टॅकल्स, आर आर किंग, शिवशाही इलेक्ट्रीकल आणि शिवसूत्र तालीम या संघांनी प्रतिस्पर्ध्यांवर मात करत विजयी सलामी दिली.या भव्य क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन आमदार अशोक माने यांच्या हस्ते व प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले.या उद्घाटन प्रसंगी माजी जि. प. सदस्य महेश चव्हाण, कोल्हापूर जिल्हा कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष प्रा. संभाजी पाटील, उपसरपंच विजय जाधव, तंटामुक्ती समिती सदस्य सतीश पाटील, भाजप ओबीसी जिल्हाध्यक्ष दीपक रानमाळे, तसेच संयोजक अध्यक्ष संभाजी भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती.याप्रसंगी बोलताना आ. अशोकराव माने यांनी, ग्रामीण भागातील खेळाडूंना अशा व्यावसायिक लीगच्या माध्यमातून मोठे व्यासपीठ मिळत असल्याबद्दल सर्वेश्वर मंडळाचे कौतुक केले.आठ तुल्यबळ संघांमध्ये रंगणार ‘महासंग्राम’ या लीग कबड्डी स्पर्धेत एकूण आठ प्रायोजकत्व (स्पॉन्सर्ड) असलेले संघ विजेतेपदासाठी एकमेकांशी भिडणार आहेत.यामध्ये सर्वेश्वर योद्धा,शिवमुद्रा,रोहीदास,शिवशाही इलेक्ट्रीकल्स,बाळूमामा चॅम्पीयन,सिद्धांत वॉर टॅकल्स,आर आर किंग,थ्री वॉरीयर्स,शिवसूत्र तालीम या नामवंत संघांचा समावेश आहे. पहिल्या दिवशी झालेल्या चुरशीच्या सामन्यांमध्ये खेळाडूंनी चढाई आणि पकडीचे उत्कृष्ट प्रदर्शन करत उपस्थितांची मने जिंकली.स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सर्वेश्वर मंडळाचे अध्यक्ष राजाराम सावंत, उपाध्यक्ष गजानन कौंदाडे व अमर जाधव, उद्योजक संतोष बाटे, संग्राम कदम, उदय पाटील, अक्षय सावंत, सुनील पाटील, हरी पुजारी यांच्यासह सर्वेश्वर कला, क्रीडा व सांस्कृतिक तरुण मंडळाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते अहोरात्र परिश्रम घेत आहेत.या स्पर्धेला शिरोली परिसरातील क्रीडाप्रेमींनी मोठ्या संख्येने हजेरी लावली आहे.