पुलाची शिरोली प्रतिनिधी / कुबेर हंकारे
कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील पेठवडगाव इथल्या केबल व्यावसायिक असलेल्या 35 वर्षीय वैभव शितल उपाध्ये यांचे अपहरण करून पाच लाख रुपये खंडणी दे नाहीतर तुला जिवंत सोडणार नाही अशी धमकी देऊन पाठीमध्ये कोयत्याने खुनी हल्ला करणाऱ्या 20 वर्षीय ओमकार दबडे आणि त्याच्या अन्य तीन साथीदारांच्यावर पेठ वडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित चारही आरोपींना ताब्यात घेतले असून त्यातील एक आरोपी अल्पवयीन आहे. त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने सोमवार पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. गुन्ह्यातील गाडीही जप्त करण्यात आली आहे.याबाबत पेठ वडगाव पोलिसांच्या कडून मिळालेली अधिक माहिती अशी की पेठ वडगाव इथल्या जैन मंदिर परिसरात वैभव शितल उपाध्ये हे कुटुंबासह राहत आहेत. त्यांचा मिणचे, संभापूर मध्ये केबल व्यवसाय आहे. मंगळवार दिनांक 28 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता वैभव उपाध्ये यांना ओमकार दबडे, प्रथमेश वारे आणि ओमकार शिंदे यांच्यासह अन्य एका अल्पवयीन मुलाने फोन करून कामानिमित्त पेठ वडगाव केएमटी बस स्टॉप जवळ बोलावले. त्या ठिकाणी ते आल्यानंतर त्यांना मोटरसायकलवर बसून घेऊन सहारा चौकात काम असल्याचे सांगून तिथे घेऊन आले. सहारा चौकामध्ये निळ्या रंगाची चार चाकी गाडी थांबली होती वैभव उपाध्ये यांना चार चाकी गाडीमध्ये बसायला सांगून ओमकार दबडे आणि त्याचे अन्य तीन साथीदारांनी चार चाकी गाडीत बसून वैभव उपाध्ये यांना घेऊन तासगाव ते मौजे वडगाव रोडवर असणाऱ्या डोंगरामध्ये घेऊन गेले. डोंगराच्या पायथ्याशी वैभव यांना चौघांनी लाथा बुक्क्याने मारहाण केले. आणि पाच लाख रुपयाची खंडणी मागितली. पाच लाख रुपये न दिल्यास जीवे ठार मारण्याची धमकी दिली. यावेळी वैभव यांनी माझ्याकडे काहीच पैसे नसल्याचे सांगितल्याने संतप्त झालेल्या ओमकार दबडे याने चार चाकी गाडीतील कोयता काढून जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने वैभव याच्या पाठीमध्ये गंभीर वार केले. यामध्ये मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने आरोपींनी पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने वैभव याच्या अंगातील शर्ट काढून जाळून टाकला. आणि दोन दिवसात रोख दहा हजार रुपये आणि पाच तारखेपर्यंत पाच लाख रुपये आणून न दिल्यास जीवे ठार मारण्याची धमकी देऊन पसार झाले. याबाबतची तक्रार वैभव उपाध्ये यांनी पेठवडगाव पोलीस ठाण्यात केली आहे. पेठवडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रमोद शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन अशाप्रकारे धमकी देऊन कोण पैसे उकळण्याचा प्रयत्न करत असेल तर तात्काळ पोलीस स्टेशनची संपर्क साधावा संबंधितावर योग्य ते कारवाई केली जाईल.