शिरोळ / प्रतिनिधी
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरांनी विश्वकल्याणासाठी केलेल्या ‘पसायदान’ या प्रार्थनेतून प्रेरणा घेत शिरोळ येथील उद्योगपती संजीव आण्णा पुजारी यांनी स्थापन केलेली पसायदान इलेक्ट्रिकल्स कंपनी आज ऊर्जा बचतीच्या क्षेत्रात मोलाची भूमिका बजावत आहे.कंपनीने विकसित केलेल्या अत्याधुनिक कॅपॅसिटर तंत्रज्ञानामुळे विविध आस्थापनांचे वीजबिल कमी करण्यास मोठी मदत होत आहे.पसायदान इलेक्ट्रिकल्सच्या माध्यमातून ‘पावर फॅक्टर इम्प्रूव्हमेंट’ची कामे मोठ्या प्रमाणावर केली जातात. यामध्ये सरकारी, निमसरकारी तसेच खाजगी क्षेत्रातील उद्योग, साखर कारखाने, नगरपालिका, महानगरपालिका यांचा समावेश आहे. तसेच मिलिटरीमधील नेव्ही,एअर फोर्स आणि विविध ट्रेनिंग सेंटर्समध्येही या तंत्रज्ञानाचा यशस्वी वापर होत आहे. या कामांमुळे ऊर्जा कार्यक्षमतेत वाढ होऊन वीजेचा अपव्यय कमी होतो आणि परिणामी वीजबिलात लक्षणीय बचत होते.कंपनीने भारतात मोजक्याच उत्पादकांमध्ये गणना होणाऱ्या हायटेक मिडीयम फ्रिक्वेन्सी वॉटर-कूल्ड कॅपॅसिटरची निर्मितीही सुरू केली आहे.हे कॅपॅसिटर फर्नेस आणि स्टील प्लांटमध्ये अत्यंत उपयुक्त ठरत असून, त्यांच्या गुणवत्तेमुळे भविष्यात निर्यात क्षेत्रातही कंपनी मोठी झेप घेईल, असा विश्वास संजीव पुजारी यांनी व्यक्त केला आहे.नुकतेच शिरोळ नगरपालिकेच्या जॅकवेल येथील पंपगृहामध्ये पावर फॅक्टर सुधारण्यासाठी कॅपॅसिटर बसवण्यात आले आहेत. या उपक्रमामुळे दरमहा सुमारे ४० हजार रुपये तर वार्षिक सुमारे ५ लाख रुपयांची वीजबिलात बचत होणार आहे. विशेष म्हणजे या प्रकल्पाची देखभाल आणि दुरुस्तीची जबाबदारीही कंपनीने स्वतः घेतली आहे, ज्यामुळे दीर्घकालीन लाभ सुनिश्चित होणार आहे.शिरोळचे उपनगराध्यक्ष पृथ्वीराजसिंह यादव यांच्या नेतृत्वाखाली गावाच्या सर्वांगीण विकासासाठी सुरू असलेल्या उपक्रमांना हातभार लावण्याच्या उद्देशाने हे काम सामाजिक बांधिलकीतून विनामूल्य करण्यात आले असल्याचे संजीव पुजारी यांनी सांगितले. उर्जा बचत,आर्थिक कार्यक्षमता आणि सामाजिक जबाबदारी यांचा उत्तम संगम साधणाऱ्या या उपक्रमामुळे पसायदान इलेक्ट्रिकल्सची कार्यपद्धती कौतुकास्पद ठरत असून, इतर संस्थांसाठीही हा प्रकल्प आदर्श ठरू
शकतो.