शिरोली एमआयडीसी पोलिसांची कारवाई; गुटख्यासह ६५ हजारांचा मुद्देमाल जप्त, एकावर गुन्हा

Spread the love
पुलाची शिरोली / प्रतिनिधी कुबेर हंकारे 
पुलाची शिरोली परिसरात अवैध गुटखा वाहतूक करणाऱ्यांवर पोलिसांनी धडक कारवाई करत सुमारे ६५ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी एका संशयित आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने ही कारवाई केली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सायंकाळी सुमारे ४:४० वाजण्याच्या सुमारास पुलाची शिरोली येथील माळवाडी परिसरातील राजमाता जिजाऊ नगरमध्ये ‘दत्तगुरु किराणा स्टोअर्स’समोर संशयास्पद हालचाल करणारा एक व्यक्ती दुचाकीवरून जात असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी तत्काळ सापळा रचून संशयिताला अडवले. तपासणीदरम्यान आरोपी सुदर्शन सागर गागडे (वय ३७, रा. शांतीनगर, इचलकरंजी, सध्या रा. पुलाची शिरोली, ता. हातकणंगले) हा आपल्या ताब्यातील दुचाकी (MH-09-DW-5616) वरून अवैध गुटखा, सुगंधी तंबाखू आणि सुपारीची वाहतूक करत असल्याचे उघड झाले. पोलिसांनी त्याच्याकडून विविध कंपन्यांच्या सुगंधी सुपारी, तंबाखू व पान मसाल्याची पाकिटे जप्त केली.या कारवाईत आर. एन. सुगंधी सुपारी, एम. सुगंधी तंबाखू, विमल पान मसाला, तसेच ‘वि-१’ तंबाखू अशी विविध प्रकारची पाकिटे मिळून सुमारे १५० पेक्षा अधिक पाउच जप्त करण्यात आले. याशिवाय आरोपीकडील ४०० रुपये रोख रक्कम आणि एच. एफ. डिलक्स कंपनीची मोटारसायकल (किंमत अंदाजे ५०,००० रुपये) जप्त करण्यात आली. एकूण मुद्देमालाची किंमत ६५,७०० रुपये इतकी आहे.महाराष्ट्र राज्यात गुटखा व तत्सम तंबाखूजन्य पदार्थांवर बंदी असतानाही त्याची अवैध वाहतूक व विक्री सुरू असल्याचे या कारवाईतून स्पष्ट झाले आहे. अशा पदार्थांचे सेवन आरोग्यास घातक असून, कायद्यानेही त्यावर कठोर बंदी घालण्यात आली आहे.ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, कोल्हापूर येथील पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली रामचंद्र कोळी, महेश आंबी आणि सुरेश पाटील यांच्या पथकाने केली. या प्रकरणी शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात संबंधित आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!