कोल्हापूर / प्रतिनिधी
जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण सभापतीपदी श्रद्धाताई गायकवाड यांनी आज पदभार स्वीकारला. राजर्षी शाहू विकास आघाडीचे प्रमुख आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा उत्साहात पार पडला. या प्रसंगी विविध पदाधिकारी, अधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.या प्रसंगी बोलताना आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी श्रद्धाताई गायकवाड यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या. कोल्हापूर जिल्ह्यातील समाजकल्याण विभागांतर्गत येणाऱ्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी त्या निश्चितपणे प्रयत्नशील राहतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. समाजातील वंचित, दुर्बल आणि गरजू घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी त्या सातत्याने काम करतील, असेही त्यांनी नमूद केले. समाजसेवेची त्यांची जिद्द आणि निस्वार्थ वृत्ती जिल्ह्याच्या विकासासाठी निश्चितच उपयुक्त ठरेल, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी नूतन सभापती श्रद्धाताई गायकवाड यांनी आपल्या मनोगतातून पदाची जबाबदारी पार पाडण्याचा निर्धार व्यक्त केला. त्या म्हणाल्या, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील सर्व समाजघटकांना न्याय देण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत. समाजकल्याण विभागाच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा लाभ तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचविण्यावर भर दिला जाईल. सभापती पद हे केवळ पद नसून जनतेची सेवा करण्याचे एक प्रभावी साधन आहे, या भावनेतून काम करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.कार्यक्रमादरम्यान आमदार यड्रावकर यांच्या हस्ते श्रद्धाताई गायकवाड यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. उपस्थितांनीही त्यांना शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी माजी आमदार उल्हास पाटील, कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक अर्जुन आबिटकर, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शिल्पाताई खोत, उपाध्यक्ष तानाजी पाटील, सभागृह नेते सुधीर देसाई, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील आसुरलेकर, नवनियुक्त जिल्हा परिषद अधिकारी जस्मिन मॅडम, अर्थ व शिक्षण सभापती शितल यादव, महिला आणि बालकल्याण सभापती विद्या पाटील, बांधकाम व आरोग्य सभापती सारिका नांदेकर, जिल्हा परिषद सदस्य अमोल चव्हाण, उत्तरादेवी शिंदे, प्रचिता कोळी, पंचायत समिती सभापती मिलिंद कुरणे, सुभाषसिंग राजपूत, सागर शंभूशेटे, प्रकाश पाटील टाकवडेकर, नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर, अमरसिंह पाटील, भवानीसिंग घोरपडे, अविनाश गायकवाड, सर्व पंचायत समिती सदस्य, यांच्यासह राजर्षी शाहू विकास आघाडीचे पदाधिकारी, सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.