शेतीच्या वादातून हिंगणगावात दुहेरी खून; बाप-लेकाचा मृत्यू, संशयित आरोपी भाऊ ताब्यात

Spread the love
हातकणंगले / प्रतिनिधी
तालुक्यातील हिंगणगाव येथे शेतीच्या वादातून दोन भावांमध्ये झालेल्या वादाचे भीषण रूपांतर दुहेरी खुनात झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.या घटनेत लहान भाऊ शितल मारुती कुंडले (वय ४०) व वडील मारुती बंडू कुंडले (वय ७२) यांचा मृत्यू झाला असून थोरला भाऊ संभाजी मारुती कुंडले (वय ४७) याच्यावर खुनाचा आरोप आहे.मिळालेल्या माहितीनुसार, कुंडले कुटुंबातील भावांमध्ये शेतीच्या वादावरून गेल्या अनेक वर्षांपासून वाद सुरू होता.या वादामुळे घरात वारंवार तणावाचे वातावरण निर्माण होत होते.सायंकाळच्या सुमारास संबंधित शेतजमिनीवरून पुन्हा एकदा वाद निर्माण झाला.या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि संतापाच्या भरात संभाजी कुंडले याने आपल्या वडील व लहान भावावर हल्ला केल्याचे समोर आले आहे.या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या मारुती कुंडले व शितल कुंडले यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे हिंगणगाव परिसरात एकच खळबळ उडाली असून गावकरी मोठ्या संख्येने घटनास्थळी जमा झाले होते.पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा सुरू केला. दरम्यान, या जमिनीच्या वादासंदर्भात चार दिवसांपूर्वीच हातकणंगले पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती.मात्र या तक्रारीची वेळेत दखल घेतली असती तर ही दुर्दैवी घटना टळली असती,अशी भावना ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे.घटनेनंतर पोलिसांनी आरोपी संभाजी कुंडले याला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.रात्री उशिरापर्यंत पंचनामा व अन्य कायदेशीर प्रक्रिया सुरू होती.या दुहेरी खुनामुळे संपूर्ण हिंगणगाव परिसर हादरून गेला आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!