पुलाची शिरोली / प्रतिनिधी कुबेर हंकारे
शिरोली पुलाची ता हातकणंगले येथील ग्रामपंचायतीच्या घंटागाडीतून घनकचरा व चिकन दुकानातील टाकाऊ मांस (वेस्ट) वाहून नेत असताना, चालकाच्या हलगर्जीपणामुळे हे मांस भररस्त्यात पडल्याची धक्कादायक घटना आज सकाळी घडली आहे. शिरोली औद्योगिक वसाहतीमधील जाफराणी वजन काट्याजवळ ही घटना असून परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली आहे. या प्रकारामुळे उद्योजक आणि ग्रामस्थांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.ग्रामपंचायतीची घंटागाडी गावातील घनकचर्या सोबत चिकन दुकानातील टाकाऊ मांस घेऊन जात असताना जाफराणी काट्याजवळून माळवाडी व गावाकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर चालकाच्या निष्काळजीपणामुळे हे मांस रस्त्यावर पडले. सध्या परिसरात उन्हाचा पारा वाढलेला असल्याने काही वेळातच या मांसाचा वास सुटल्याने परिसरात दुर्गंधी पसरल्याने येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांना या दुर्गंधीचा मनस्ताप सहन करावा लागला.औद्योगिक वसाहतीत अशा प्रकारची ही पहिलीच घटना नाही. यापूर्वी देखील वेस्ट मेडिसीन (वैद्यकीय कचरा) घेवून जात असताना घंटागाडीतून त्यावेळीही रस्त्यावर पडला होता या गंभीर बाब लक्षात घेवून वैद्यकीय अधिकाऱ्यांनी ग्रामपंचायतीला लेखी पत्र देऊन समज दिली होती. तर आमदार अमल महाडिक यांनी देखील संबंधित ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची कानउघाडणी करत त्यांना धारेवर धरले होते. मात्र, इतके होऊनही प्रशासकीय कामकाजात कोणतीही सुधारणा झालेली दिसत नाही. शिरोलीचा घनकचरा औद्योगिक वसाहतीच्या जागेत टाकला जात असल्याचा वाद सध्या जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रलंबित आहे. एकीकडे कचरा डेपोचा प्रश्न गंभीर असताना, दुसरीकडे अशा प्रकारे रस्त्यावर मांस सांडल्याने ग्रामपंचायतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. गावचे सरपंच आणि संबंधित पदाधिकारी केवळ विकासाच्या गप्पा मारतात, मात्र प्रत्यक्ष स्वच्छतेकडे आणि आरोग्यदायक वातावरणाकडे त्यांचे दुर्लक्ष होत असल्याचे या घटनेवरून स्पष्ट होत आहे.शिरोली औद्योगिक वसाहत हा या भागाच्या विकासाचा कणा मानला जातो. मात्र, अशा अस्वच्छतेच्या घटनांमुळे उद्योजक चिंताग्रस्त आहेत. ग्रामपंचायत प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.