शिरोळ नगरपरिषदेच्या वतीने मा खा राजू शेट्टी यांचा सत्कार; भगतसिंह पुरस्काराने चळवळीला नवी प्रेरणा

Spread the love

शिरोळ / प्रतिनिधी 

पुणे येथे कृष्णा पब्लिकेशन व सरहद संस्थेतर्फे प्रदान करण्यात आलेल्या ‘युगद्रष्टा शहीद भगतसिंह पुरस्काराने’ सन्मानित झाल्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व माजी खासदार राजू शेट्टी यांचा शिरोळ नगर परिषदेतर्फे नागरी सत्कार करण्यात आला. शहीद भगतसिंह यांचे पुतणे ज्येष्ठ विचारवंत किरणजीत सिंह यांच्या हस्ते हा पुरस्कार शेट्टी यांना प्रदान करण्यात आला होता.शिरोळ नगर परिषद सभागृहात पार पडलेल्या या कार्यक्रमात नगराध्यक्षा योगिता कांबळे, उपनगराध्यक्ष पृथ्वीराजसिंह यादव तसेच सर्व नगरसेवकांच्या उपस्थितीत शेट्टी यांचा पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला.यावेळी बोलताना राजू शेट्टी म्हणाले की,शेतकरी चळवळीत काम करत असताना राज्य,देशपातळीवर अनेक पुरस्कार मिळाले;मात्र शहीद भगतसिंह यांच्या नावाने, त्यांच्या कुटुंबातील व्यक्तीकडून मिळालेला हा पुरस्कार माझ्यासाठी विशेष आहे.हा सन्मान माझ्या चळवळीला नवी प्रेरणा देणारा ठरला असून पुढील कार्यासाठी ऊर्जा देणारा आहे, असे त्यांनी सांगितले.ते पुढे म्हणाले की, आपल्या गावाकडून,आपल्या लोकांकडून होणारा सत्कार हा नेहमीच वेगळे समाधान देणारा असतो.नगर परिषद सभागृहात झालेला हा सन्मान माझ्यासाठी अत्यंत भावनिक आणि अभिमानास्पद आहे.याबद्दल त्यांनी शिरोळ नगर परिषदेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे आणि नगरसेवकांचे मनःपूर्वक आभार मानले.यावेळी शेट्टी यांनी नगरपरिषदेच्या कामकाजाबाबतही अपेक्षा व्यक्त करताना सर्व नगरसेवकांनी लोकहिताचा कारभार करावा,विकासकामांना प्राधान्य द्यावे आणि जनतेचा विश्वास कायम राखावा,अशा शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमास मुख्याधिकारी निशिकांत प्रचंडराव,शिवशाही प्रणित यादव आघाडी व राजर्षी शाहू विकास आघाडीचे नगरसेवक-नगरसेविका यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Comment

error: Content is protected !!