पुलाची शिरोली / प्रतिनिधी कुबेर हंकारे
टोप (ता. हातकणंगले) येथील भोसले खडी मळ्यात सर्पदंश झाल्याने एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. सुनीता सर्जेराव भोसले (वय ५५) असे मृत महिलेचे नाव असून, या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.मिळालेल्या माहितीनुसार, सुनीता भोसले या आज बुधवारी सकाळी नेहमीप्रमाणे शेतीकामासाठी बिरदेव मंदीरामागे असणाऱ्या भोसले खडी मळ्यातील आपल्या शेतात गेल्या होत्या. शेतात साठवून ठेवलेला कडबा उचलत असताना, त्याखाली बसलेल्या घोणस जातीच्या सापाने त्यांच्या पायाला जोरात चावा घेतला सापाने चावा घेतल्याचे लक्षात येताच सुनीता यांनी आरडाओरडा केला. बाजूला काम करणाऱ्या लोकांनी तातडीने धाव घेतली. तिथे असणाऱ्या ग्रामस्थांनी सापाला मारले आणि सुनीता यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र, घोणसचे विष शरीरात वेगाने भिनल्यामुळे त्यांची प्रकृती खालावली आणि दुपारच्या सुमारास उपचारादरम्यान त्यांचा आकस्मित मृत्यू झाला.या घटनेमुळे तो परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.