पुलाची शिरोली / प्रतिनिधी कुबेर हंकारे
बेकायदेशीररित्या गावठी बनावटीचे पिस्तुल बाळगणाऱ्या तरुणाला शिरोली एमआयडीसी पोलिसांनी अटक केली असून त्याच्याकडून सुमारे ३० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई १७ मार्च २०२६ रोजी रात्री उशिरा करण्यात आली.याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर ८८/२०२६ अन्वये भारतीय हत्यार कायदा कलम ३(१), २५ तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम १२२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी सुहास मधुकर संकपाळ यांनी फिर्याद दिली आहे.अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव राजवर्धन आनंदराव पाटील (वय २१, रा. आंबा चौक, कुपवाड रोड, सांगली) असे आहे. पोलिसांनी दिलेली अधीक माहिती अशी १७ मार्च रोजी रात्री सुमारे १०.५५ वाजण्याच्या सुमारास पुलाची शिरोली परिसरातील प्राथमिक आरोग्य केंद्राजवळील अंकुर विद्यालयाच्या बाजूस आरोपी संशयास्पद हालचाली करताना आढळून आला. पोलिसांनी त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे विनापरवाना गावठी बनावटीचे पिस्तुल आढळून आले.या कारवाईत स्टील रंगाचे बोर असलेले व बॉडी काळ्या रंगाचे ग्रिप असलेले गावठी पिस्तुल आणि त्याची मॅगझिन जप्त करण्यात आली. मात्र, मॅगझिनमध्ये कोणतीही जिवंत काडतुसे आढळून आली नाहीत. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची किंमत सुमारे ३० हजार रुपये असल्याचे शिरोली पोलिसांनी सांगितले.ही कारवाई शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सपोनि सुनील गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या पथकात सहाय्यक फौजदार शेंगाळ, पोहेकॉ १२४४ माने, पोहेकॉ १४५९ पवार, पोका १५५१ पाटील, अँटी नार्कोटिक्स टास्क फोर्स कोल्हापूर कृती विभागाचे सहा फौजदार अनिल पास्ते, पोहेकॉ ११७६ महेश गवळी व पोहेकॉ ४०४ अर्जुन वसंतराव बेंद्रे यांचा समावेश होता.या प्रकरणाचा पुढील तपास पोसई पांडे करत असून, आरोपीकडून अधिक चौकशी सुरू आहे. या कारवाईमुळे परिसरात बेकायदेशीर शस्त्र बाळगणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.