शिरोळ / प्रतिनिधी
वारकरी संप्रदायातील भक्ती, श्रद्धा आणि सामूहिक साधनेचे प्रतीक असलेली चैत्र वारी पायी दिंडी यंदाही शिरोळातून मोठ्या उत्साहात पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे. रविवार दिनांक २२ मार्च २०२६ रोजी शिरोळ येथून वारकऱ्यांची पायी दिंडी विठुरायाच्या भेटीसाठी मार्गस्थ होणार असून या दिंडीसोहळ्याबाबत वारकरी व भक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.शिरोळ येथील उद्योगपती ह.भ.प. हणमंत उर्फ दादासाहेब इंगळे यांच्या गुरुप्रसाद उद्योग समूहाच्या वतीने गेल्या ११ वर्षांपासून चैत्र वारी निमित्त वारकऱ्यांसाठी मोफत पायी दिंडीचे आयोजन केले जाते. वारकरी संप्रदायाची परंपरा जपत आणि भक्तीभाव वृद्धिंगत करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम सातत्याने राबविण्यात येत आहे. यंदाही मोठ्या संख्येने वारकरी या दिंडीत सहभागी होणार असल्याचे आयोजकांनी सांगितले. रविवार २२ मार्च रोजी सकाळी शिरोळ येथील श्री हनुमान मंदिरातून दिंडीचे प्रस्थान होणार आहे. यावेळी ह.भ.प. राजाराम महाराज यांच्या उपस्थितीत विधिवत विठ्ठल-रुख्मिणी पूजन करून दिंडी पंढरपूरकडे मार्गस्थ होईल. टाळ-मृदुंगाच्या गजरात, अभंग-भजनांच्या सुरात आणि “ज्ञानोबा माऊली तुकाराम”च्या जयघोषात वारकरी विठुरायाच्या दर्शनासाठी पायी प्रवास सुरू करतील.या पायी दिंडीच्या प्रवासादरम्यान विविध ठिकाणी मुक्कामाची व्यवस्था करण्यात आली आहे.प्रत्येक मुक्कामस्थळी कीर्तन, प्रवचन, भजन आणि धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करून वारकऱ्यांना आध्यात्मिक मार्गदर्शन केले जाणार आहे. रविवार २२ मार्च रोजी तुळशी बाग, कळंबी येथे दिंडीचा पहिला मुक्काम होईल. येथे ह.भ.प. विक्रम बनकर महाराज (कनवाड) यांचे कीर्तन होणार आहे.सोमवार २३ मार्च रोजी लठ्ठे विद्यामंदिर, कुची येथे दिंडीचा मुक्काम असून त्या ठिकाणी ह.भ.प. महेश कळेकर (शिरोळ) यांचे कीर्तन आयोजित करण्यात आले आहे. मंगळवार २४ मार्च रोजी मानदेश महाविद्यालय, जुनोनी येथे दिंडी मुक्काम करणार असून येथे ह.भ.प. राजाराम व्हनमाने (जुनोनी) यांचे कीर्तन होईल.तसेच बुधवार २५ मार्च रोजी प्राथमिक शाळा, कमलापूर येथे दिंडीचा मुक्काम होणार आहे. या ठिकाणी ह.भ.प. राम नरहरी ननवरे (कडलास) यांचे कीर्तन होईल. गुरुवार २६ मार्च रोजी प्राथमिक शाळा, संगेवाडी येथे दिंडी मुक्काम करणार असून येथे ह.भ.प. संस्कार महाराज खंडागळे (संगेवाडी) यांचे कीर्तन होणार आहे.शुक्रवार २७ मार्च रोजी दिंडीचा अंतिम मुक्काम पंढरपूर येथील एकनाथ भवन येथे होणार आहे. या ठिकाणी ह.भ.प. पुंडलिक कोळी व ह.भ.प. रंगराव माने गावडे यांचे कीर्तन आयोजित करण्यात आले आहे. त्यानंतर वारकरी विठ्ठल-रुख्मिणीचे दर्शन घेऊन आपल्या आध्यात्मिक यात्रेची सांगता करतील.शिरोळ व परिसरातील वारकरी मोठ्या संख्येने या पायी दिंडीत सहभागी होत असतात. वारकरी संप्रदायातील परंपरा जपत भक्तीभाव, सामूहिक साधना आणि समाजात आध्यात्मिक जागृती निर्माण करण्याचे कार्य या दिंडीच्या माध्यमातून होत असल्याचे मानले जाते.या दिंडी सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी हणमंत उर्फ दादासाहेब इंगळे, अनिल इंगळे, सुनील इंगळे, किरण ताराप – माने, शंकर गावडे, सर्जेराव माने, भरत रोडे, विलास गावडे यांच्यासह वारकरी संप्रदायातील अनेक मान्यवर परिश्रम घेत आहेत. वारकरी भक्तांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन या आध्यात्मिक सोहळ्याला उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.