शिरोळ / प्रतिनिधी
समाजकार्याचा वसा आणि वारसा मनात असला की संकटसमयी माणुसकीचा हात पुढे येतो,याचे जिवंत उदाहरण आंदोलन अंकुश संघटनेचे तालुकाध्यक्ष नागेश काळे यांनी दाखवून दिले आहे.बेडकीहाळ पुलावर झालेल्या अपघातात जखमी झालेल्या व्यक्तीला वेळेवर मदत करून त्यांनी माणुसकीचे दर्शन घडवत एक प्रकारे त्या व्यक्तीला नवजीवन दिले.मिळालेल्या माहितीनुसार,बेडकीहाळ पुलावर चांद शिरदवाड येथील मुजावर यांचा अपघात झाला.अपघातानंतर ते गंभीर जखमी अवस्थेत रस्त्यावर पडले होते.परिसरात अनेक लोक जमले होते,मात्र कोणीही त्यांना आपल्या वाहनात घालून दवाखान्यात नेण्यास तयार नव्हते.काही जण फक्त पाहत होते,तर काही जण निघून जात होते.याच वेळी तेथून जात असलेले आंदोलन अंकुश संघटनेचे तालुकाध्यक्ष नागेश काळे यांनी ही घटना पाहिली. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यांनी तातडीने अँब्युलन्सला फोन करून बोलावले. मात्र अँब्युलन्स वेळेत पोहोचत नसल्याचे लक्षात येताच त्यांनी क्षणाचाही विलंब न करता जखमी मुजावर यांना मोटरसायकलला जोडलेल्या गाड्यात घालून आणि थेट दवाखान्यात दाखल केले.नागेश काळे यांच्या या तातडीच्या निर्णयामुळे जखमी व्यक्तीला योग्य वेळी उपचार मिळाले आणि त्यांचा जीव वाचण्यास मदत झाली.समाजाप्रती असलेली जबाबदारी आणि माणुसकीची जाणीव यामुळे त्यांनी कोणतीही भीती न बाळगता पुढाकार घेतला.आजच्या काळात अनेकदा अपघातग्रस्तांना मदत करण्याऐवजी लोक दूर राहण्याचा प्रयत्न करतात.अशा परिस्थितीत नागेश काळे यांनी दाखवलेली संवेदनशीलता आणि धाडस हे समाजासाठी प्रेरणादायी ठरत आहे.टाकवडे येथील नागेश काळे यांनी केलेल्या या समाजकार्याबद्दल परिसरात त्यांचे कौतुक होत असून अनेकांनी त्यांच्या या कार्याचा अभिमान व्यक्त केला आहे.संकटसमयी धावून जाऊन मदत करण्याची त्यांची वृत्ती ही खऱ्या अर्थाने समाजसेवेचे उत्तम उदाहरण ठरत आहे.