पुलाची शिरोली /प्रतिनिधी कुबेर हंकारे
जनावरांमध्ये आढळणाऱ्या लाळखुरकुत (एफएमडी) या संसर्गजन्य आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुलाची शिरोली येथे पशुवैद्यकीय चिकित्सालयाच्या वतीने लसीकरण मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत गावातील जनावरांना लाळखुरकुत प्रतिबंधक लस देण्यात आली.पशुवैद्यकीय विभागाच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम पार पडली. यावेळी पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. सुनील लोंगणे व पशुधन पर्यवेक्षक एस. एस. तातळे यांनी जनावरांना लसीकरण केले. या उपक्रमामुळे गावातील शेतकरी व पशुपालकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात आले.या लसीकरण मोहिमेदरम्यान ग्रामपंचायत सदस्य सौ. मनीषा संपत संकपाळ तसेच शिरोली हाऊसिंगचे चेअरमन संपत संकपाळ यांची उपस्थिती होती. त्यांच्या उपस्थितीत गावातील विविध शेतकऱ्यांच्या जनावरांना लसीकरण करण्यात आले. जनावरांचे आरोग्य सुरक्षित राहावे आणि लाळखुरकुतसारख्या धोकादायक आजाराचा प्रसार रोखावा या उद्देशाने ही मोहीम राबविण्यात आली असल्याचे यावेळी सांगण्यात आले.लाळखुरकुत हा जनावरांमध्ये जलदगतीने पसरणारा आजार असून त्यामुळे जनावरांच्या तोंडात व पायांवर जखमा होतात.या आजारामुळे जनावरांचे दूध उत्पादन कमी होते तसेच शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता असते. त्यामुळे वेळोवेळी लसीकरण करणे अत्यंत आवश्यक असल्याचे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.या लसीकरण मोहिमेत विजय लाड, संभाजी संकपाळ तसेच गावातील इतर शेतकरी व पशुपालकांनीही सहभाग घेतला. लसीकरण करताना शेतकऱ्यांना जनावरांच्या आरोग्याबाबत आवश्यक मार्गदर्शनही करण्यात आले.लसीकरण मोहिमेच्या वेळी शुभम घाडगे, सोहम शेळके आणि शिवम धनवट यांनी जनावरांना पकडून लसीकरणासाठी सहकार्य केले. त्यांच्या सहकार्यामुळे लसीकरण मोहीम सुरळीत पार पडली. गावातील जनावरांचे आरोग्य चांगले राहावे आणि पशुपालकांचे नुकसान टळावे या उद्देशाने अशा प्रकारच्या लसीकरण मोहिमा नियमितपणे राबविण्यात येणार असल्याचे पशुवैद्यकीय विभागाकडून सांगण्यात आले.या उपक्रमामुळे गावातील पशुपालकांनी समाधान व्यक्त केले आहे.