पुलाची शिरोली / प्रतिनिधी कुबेर हंकारे
पुणे–बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर सांगली फाटा परिसरात अज्ञात वाहनाने मोटारसायकलला जोराची धडक दिल्याने मोटारसायकलवरील दोघे जण गंभीर जखमी झाल्याची घटना गुरुवारी सायंकाळी घडली. या अपघातानंतर परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. जखमींना तात्काळ कोल्हापूर येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी सायंकाळी सुमारे सहा वाजून तीस मिनिटांच्या सुमारास पुणे–बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर सांगली फाटा येथील हॉटेल पार्वतीसमोर हा अपघात घडला. मोटारसायकलवरून प्रवास करणाऱ्या दोघांना अज्ञात वाहनाने मागून जोराची धडक दिली. धडक इतकी भीषण होती की मोटारसायकलचा अक्षरशः चक्काचूर झाला.या अपघातात अमित चोगुले (वय ४६) आणि प्रथनेश सोने (वय २१) हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. हे दोघे पुण्याहून कोल्हापूरकडे मोटारसायकलवरून जात होते. दरम्यान शिरोली पुलाची परिसरातील हॉटेल पार्वतीसमोर त्यांच्या मोटारसायकलला मागून येणाऱ्या अज्ञात वाहनाने जोराची धडक दिली. धडकेनंतर दोघेही रस्त्यावर फेकले गेले आणि त्यांना गंभीर दुखापत झाली.अपघात घडताच परिसरातील नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. जखमींना १०३३ रुग्णवाहिकेच्या मदतीने कोल्हापूर येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. डॉक्टरांकडून त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांच्या प्रकृतीबाबत अधिक माहिती अद्याप मिळू शकलेली नाही. अपघातानंतर मोटारसायकलचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून वाहनाचा चक्काचूर झाल्याने अपघाताची तीव्रता लक्षात येत आहे. महामार्गावर वाहतूक मोठ्या प्रमाणात असल्याने अशा प्रकारचे अपघात वारंवार घडत आहेतदरम्यान, या अपघाताची नोंद रात्री उशिरापर्यंत शिरोली पोलिस ठाण्यात झालेली नव्हती. पोलिसांकडून अज्ञात वाहनाचा शोध घेण्याचे काम सुरू असून अपघात नेमका कसा घडला याचा तपास केला जात आहे. महामार्गावरील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करून संबंधित वाहनाचा माग काढण्याचा प्रयत्न पोलिसांकडून सुरू आहे.