शिरोळ / प्रतिनिधी
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत शिरोळ नगर परिषदेतर्फे शहरातील महिलांना सक्षम व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. गुरुवारी सकाळी महिला सक्षमीकरण मोटरसायकल रॅलीने या कार्यक्रमाची उत्साहात सुरुवात झाली.दिवसभर विविध उपक्रम, मार्गदर्शनपर व्याख्याने,आरोग्य तपासणी शिबिर तसेच स्वयंरोजगार मार्गदर्शन शिबिर अशा अनेक उपक्रमांमुळे महिला दिनाचा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.या महिला सक्षमीकरण मोटरसायकल रॅलीचे नियोजन सौ. योगिता घुले यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले होते.शिरोळ येथील छत्रपती शिवाजी तक्त येथे महिला व बालकल्याण सभापती सौ.कल्पना काळे,उपसभापती सौ.अनुराधा गुरव, बांधकाम सभापती सौ.अनिता संकपाळ,नगरसेविका सौ. सुवर्णा कांबळे, सौ.रेखा कोरे,सौ.सविता पुजारी, सौ.दिपाली फल्ले, सौ.ज्योत्स्ना यादव,सौ. अंजली माने,सौ.मनीषा माने,सौ.जयश्री पाटील, सौ.योगिता घुले यांच्यासह उपस्थित मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती महाराणी ताराराणी यांच्या गादीचे पूजन करण्यात आले.पूजनानंतर महिला सक्षमीकरणाचा संदेश देत शहरातून भव्य मोटरसायकल रॅली काढण्यात आली.“सक्षम महिला,सक्षम शिरोळ शहर”, “महिला शक्ती, राष्ट्र शक्ती”,“महिला एकजुटीचा विजय असो” अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता.या रॅलीत शहरातील महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून सुरू झालेली ही रॅली शहरातील प्रमुख मार्गांवरून काढण्यात आली.बाजारपेठ, बस स्थानक रोड,छत्रपती संभाजी चौक, पंचायत समिती मार्गे विविध चौकातून रॅलीने मार्गक्रमण केले.रॅलीमुळे शहरात महिला सक्षमीकरणाचा प्रभावी संदेश पोहोचला.यानंतर घालवाड मार्गावरील श्री मंगल कार्यालय येथे महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. सकाळपासून सायंकाळपर्यंत अनेक उपक्रम पार पडले.विशेष म्हणजे महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या शिबिराला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.आरोग्य शिबिरामध्ये स्त्रीरोग, अस्थिरोग,नेत्ररोग, दंतरोग,बालरोग अशा विविध आजारांवर तज्ञ डॉक्टरांकडून तपासणी करण्यात आली. उपस्थित महिलांना आवश्यक औषधोपचाराबाबत मार्गदर्शन देण्यात आले. तसेच रक्त तपासणी,लघवी तपासणी,क्ष-किरण तपासणी,कार्डिओग्राम अशा विविध तपासण्या देखील करण्यात आल्या.या आरोग्य तपासणी शिबिरासाठी शिरोळ पंचायत समिती आरोग्य विभाग, प्राथमिक आरोग्य केंद्र,शिरोळ ग्रामीण रुग्णालय,शिरोळ डॉक्टर असोसिएशन, स्पंदन मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल तसेच शतायू मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल यांचे सहकार्य लाभले. विविध तज्ञ डॉक्टरांनी महिलांची तपासणी करून आरोग्याबाबत महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले.आरोग्य शिबिरानंतर ख्यातनाम व्याख्याते प्रा.वैशाली जाधव (कसबा बावडा) यांचे “कळी उमलताना” या विषयावर मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.आपल्या प्रभावी भाषणातून त्यांनी महिला सबलीकरण,स्त्रीशक्तीचा जागर, कौटुंबिक व्यवस्थेत महिलांची भूमिका तसेच समाजातील महिलांचे स्थान यावर सखोल विचार मांडले.त्यांच्या प्रेरणादायी विचारांनी उपस्थित महिलांना नवीन उर्जा मिळाली.यानंतर “टाकाऊपासून टिकाऊ वस्तू” या संकल्पनेवर आधारित प्रदर्शन आणि व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. पर्यावरण संवर्धन आणि कचरा व्यवस्थापन याविषयी जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. कोल्हापूर येथील निसर्ग मित्र परिवाराचे अनिल चौगुले यांनी “माझे घनकचरा नव्हे, धन कचरा व्यवस्थापन” या विषयावर मार्गदर्शन केले.त्यांनी घरगुती कचऱ्याचे व्यवस्थापन करून त्यातून उपयोगी वस्तू तयार करण्याचे महत्त्व स्पष्ट केले.या प्रदर्शनामध्ये महिलांनी तयार केलेल्या विविध वस्तूंचे आकर्षक प्रदर्शन मांडण्यात आले होते. त्यातील उत्कृष्ट प्रदर्शन करणाऱ्या महिलांना रोख पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. ही पारितोषिके सौ.मनीषा सतीश माने यांच्या वतीने देण्यात आली.यानंतर महिला गृह उद्योग व स्वयंरोजगार मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये महिलांना विविध उद्योग व व्यवसाय संधींबाबत मार्गदर्शन करण्यात आले. महिलांनी लघुउद्योगाच्या माध्यमातून आर्थिक स्वावलंबन कसे मिळवावे याबाबत तज्ञांनी माहिती दिली.या मार्गदर्शन सत्रात लघुउद्योग व व्यवसाय मार्गदर्शन केंद्राचे संचालक डॉ. कैलास पाटील, शासकीय योजना व माहिती केंद्राच्या संचालिका सुनिता पाटील, एमएसएमई विभागाचे विजय पवार, दुर्गा महिला बहुउद्देशीय विकास संस्थेचे अभिजीत जाधव, जिल्हा संसाधन विभागाचे अनिल केरीपाळे यांनी विविध योजनांची माहिती दिली. तसेच फेडरल बँकेचे शिरोळ शाखाधिकारी महेश निकम आणि सेंट्रल बँकेचे शाखाधिकारी तेजावत वेंकटेश यांनी महिलांसाठी उपलब्ध असलेल्या कर्ज योजना आणि आर्थिक सहाय्याबाबत मार्गदर्शन केले.या शिबिराच्या माध्यमातून महिलांना उद्योग सुरू करण्यासाठी आवश्यक असलेली माहिती, शासकीय योजना, कर्ज सुविधा तसेच प्रशिक्षण याबाबत सविस्तर मार्गदर्शन मिळाले.त्यामुळे महिलांना स्वतःचा उद्योग सुरू करण्यासाठी प्रेरणा मिळाली. नगरपालिका आयोजित या महिला दिन कार्यक्रमामध्ये शहर व उपनगरातील महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. विविध उपक्रमांमुळे महिलांमध्ये आत्मविश्वास आणि प्रेरणा निर्माण झाली.या कार्यक्रमासाठी उपनगराध्यक्ष पृथ्वीराजसिंह यादव, मुख्याधिकारी निशिकांत प्रचंडराव, महिला व बालकल्याण समिती सभापती सौ.कल्पना काळे,उपसभापती सौ. अनुराधा गुरव यांच्यासह सर्व सन्माननीय नगरसेवक,नगरसेविका तसेच नगरपालिका अधिकारी आणि कर्मचारी वर्ग यांनी नियोजनबद्ध काम करून कार्यक्रम यशस्वी केला.महिला सक्षमीकरणाचा प्रभावी संदेश देणाऱ्या या उपक्रमामुळे शिरोळ शहरात महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.विविध उपक्रमांच्या माध्यमातून महिलांना आरोग्य,शिक्षण,उद्योग आणि सामाजिक सहभाग या सर्व क्षेत्रांमध्ये सक्षम बनविण्याचा प्रयत्न करण्यात आला.या कार्यक्रमामुळे महिलांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून समाजात महिलांच्या सबलीकरणासाठी अशा उपक्रमांची गरज असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले. महिला शक्ती हीच राष्ट्रशक्ती असल्याचा संदेश देत हा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.