शिरोळ / प्रतिनिधी
शिरोळ नगर परिषदेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक १० मधील नागरिकांना दिलेले आश्वासन पूर्ण करत नगरसेवक ओंकार माने गावडे यांनी येथील कचरा समस्येवर ठोस पावले उचलली आहेत. त्यांच्या प्रयत्नांमुळे अनेक वर्षांपासून नागरिकांना त्रास देणाऱ्या कचरा डेपोच्या प्रश्नावर कार्यवाही सुरू झाली असून नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.त्यांच्या या कामगिरीचे प्रभागातील नागरिकांकडून कौतुक केले जात आहे.प्रभाग क्रमांक १० मधील दसरा चौक परिसरात शहरातील कचरा एकत्र करून त्यावर खत निर्मिती प्रकल्प राबविण्याची योजना पूर्वीपासून होती.मात्र प्रत्यक्षात हा प्रकल्प दीर्घकाळ सुरू न झाल्यामुळे त्या ठिकाणी फक्त शहरातील कचरा एकत्र करून टाकला जात होता. परिणामी कचऱ्याचे मोठे ढिगारे साचत गेले आणि परिसरातील नागरिकांसाठी तो मोठा त्रासदायक प्रश्न बनला.या कचऱ्याला वारंवार आग लागण्याच्या घटना घडत होत्या.या आगीतून निघणाऱ्या दाट व विषारी धुरामुळे परिसरातील नागरिकांना श्वसनासंबंधी त्रास होऊ लागला होता.लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना याचा विशेष त्रास सहन करावा लागत होता.काही नागरिकांना श्वसनाचे आजार तसेच इतर आरोग्याच्या तक्रारी वाढल्याचेही समोर आले होते.त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली होती. स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा तत्कालीन नगराध्यक्ष तसेच नगरसेवक यांना निवेदने देऊन आणि वारंवार विनंती करून हा प्रश्न सोडवण्याची मागणी केली होती.मात्र अनेक वर्षे या मागण्यांकडे अपेक्षित गांभीर्याने लक्ष दिले गेले नाही.त्यामुळे प्रभागातील नागरिकांना हा त्रास दीर्घकाळ सहन करावा लागत होता. दरम्यान,नगर परिषद निवडणुकीच्या काळात यादव आघाडीचे उमेदवार ओंकार गावडे यांनी नागरिकांशी संवाद साधत हा प्रश्न प्राधान्याने सोडवण्याचे आश्वासन दिले होते. “मी निवडून आलो तर या कचऱ्यामुळे नागरिकांना होणारा त्रास थांबवण्यासाठी तातडीने उपाययोजना करेन,” असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले होते.त्यांच्या या आश्वासनावर विश्वास ठेवून प्रभाग क्रमांक १० मधील नागरिकांनी परिवर्तन घडवत त्यांना मोठ्या मताधिक्याने विजयी केले.निवडून आल्यानंतर नगरसेवक ओंकार गावडे यांनी नागरिकांच्या विश्वासाला पात्र ठरत हा प्रश्न नगर परिषद सभागृहात ठामपणे मांडला.दसरा चौक परिसरातील कचरा तातडीने हटवून नागरिकांना दिलासा देण्याची मागणी त्यांनी सातत्याने लावून धरली.त्यांच्या या प्रयत्नांना अखेर यश आले.नगर परिषद प्रशासनाने या प्रश्नाची दखल घेत कचरा हटवण्यासाठी आवश्यक टेंडर प्रक्रिया पूर्ण केली. त्यानंतर संबंधित ठेकेदारामार्फत कचरा उचलण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे.सध्या या ठिकाणी साचलेला कचरा हटवण्याचे काम वेगाने सुरू असून परिसर स्वच्छ करण्यासाठी यंत्रसामग्रीच्या मदतीने काम सुरू आहे.या कार्यवाहीमुळे परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.विशेषतः वारंवार लागणाऱ्या आगीमुळे निर्माण होणाऱ्या धुराच्या त्रासातून नागरिकांना काही प्रमाणात मुक्तता मिळाली आहे.परिसरातील हवा प्रदूषण कमी होण्यास मदत होत असून नागरिकांनी या कामाबद्दल समाधान व्यक्त केले आहे. प्रभागातील नागरिकांनी सांगितले की, अनेक वर्षे आम्हाला या समस्येमुळे त्रास सहन करावा लागत होता.कचऱ्याला आग लागल्यावर निर्माण होणारा धूर घरात शिरत असे आणि श्वास घेणेही कठीण होत असे.मात्र नगरसेवक ओंकार गावडे यांनी हा प्रश्न गंभीरतेने घेतला आणि त्यावर कार्यवाही सुरू करून दिलासा दिला आहे. नगरसेवक ओंकार गावडे यांनी सांगितले की,नागरिकांचे आरोग्य आणि परिसराची स्वच्छता ही आमची प्राथमिकता आहे. नागरिकांनी आमच्यावर दाखवलेला विश्वास आम्ही जपण्याचा प्रयत्न करत आहोत.उपनगराध्यक्ष पृथ्वीराजसिंह यादव यांच्या नेतृत्वाखाली कचऱ्याचा प्रश्न पूर्णपणे मार्गी लावण्यासाठी आणि परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी पुढील काळातही आवश्यक ती पावले उचलली जातील. दरम्यान,भविष्यात हा कचरा डेपो शहराच्या इतर योग्य ठिकाणी हलवून या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढावा,अशी अपेक्षा देखील प्रभाग क्रमांक १० मधील नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.नगर परिषद प्रशासनाने याबाबत दीर्घकालीन नियोजन करून शहराच्या स्वच्छतेसाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणीही नागरिकांनी केली आहे.एकूणच नगरसेवक ओंकार माने गावडे यांच्या पुढाकारामुळे प्रभाग क्रमांक १० मधील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या कचरा समस्येला मार्ग मिळू लागला आहे.नागरिकांच्या आरोग्याशी निगडित असलेल्या या प्रश्नावर झालेली कार्यवाही ही प्रभागासाठी दिलासादायक ठरत असून त्यांच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.