शिरोळ / प्रतिनिधी
शिरोळ येथील ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ, संस्कारवंत व्यक्तिमत्त्व आणि सर्वांचे लाडके आप्पासाहेब चावरे (चावरे गुरुजी) यांनी दि. १ मार्च रोजी ९० वर्षांचा टप्पा पूर्ण करून ९१ व्या वर्षात पदार्पण केले. त्यांच्या वाढदिवसानिमित्त राजर्षी शाहू महाराज कल्लेश्वर तलाव ज्येष्ठ नागरिक संघ व मित्रपरिवार यांच्या वतीने आयोजित कार्यक्रम मोठ्या उत्साहात आणि आनंदमय वातावरणात संपन्न झाला. या सोहळ्यास अनेक मान्यवर, मित्रपरिवार, माजी विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी गुरुजींचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात “दीर्घायुष्य लाभो” अशा शुभेच्छांचा वर्षाव करत वातावरण भारावून टाकले. वयाच्या ९० व्या वर्षीही गुरुजींची प्रसन्न मुद्रा, शांत स्वभाव आणि सकारात्मक विचार पाहून उपस्थितांना विशेष प्रेरणा मिळाली.चावरे गुरुजी यांनी आयुष्यभर शिक्षण क्षेत्रात प्रामाणिक व निष्ठेची सेवा बजावली.शिस्तप्रिय, कर्तव्यनिष्ठ आणि प्रेमळ शिक्षक म्हणून त्यांनी अनेक विद्यार्थ्यांचे जीवन घडवले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली घडलेले विद्यार्थी आज विविध क्षेत्रांत यशस्वीपणे कार्यरत आहेत.गुरुजींनी दिलेले संस्कार, जीवनमूल्ये आणि प्रामाणिकतेची शिकवण आजही त्यांच्या शेकडो विद्यार्थ्यांच्या स्मरणात ताजी आहे.साधेपणा, समाजाभिमुखता आणि सकारात्मक दृष्टिकोन ही त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची वैशिष्ट्ये आहेत. समाजातील प्रत्येक घटकाशी जुळवून घेण्याची त्यांची वृत्ती आणि सर्वांना आपुलकीने जोडून ठेवण्याची कला यामुळे ते सर्वांच्या मनात विशेष स्थान मिळवून आहेत.कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी गुरुजींच्या प्रदीर्घ आणि प्रेरणादायी आयुष्याचा आढावा घेत त्यांच्या कार्याचा गौरव केला. “गुरुजींचे आयुष्य हे समाजासाठी दीपस्तंभासारखे आहे. त्यांनी शिक्षणातून घडवलेली पिढी हीच त्यांची खरी संपत्ती आहे, अशा भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या. या विशेष प्रसंगी सर्वांनी गुरुजींना उत्तम आरोग्य, आनंदी आणि निरोगी दीर्घायुष्य लाभावे, अशी मनःपूर्वक सदिच्छा व्यक्त केली. आप्पासाहेब चावरे (चावरे गुरुजी) यांना ९० व्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा! त्यांच्या आयुष्याचा प्रकाश असाच समाजाला मार्गदर्शन करत राहो, हीच प्रार्थना.