शिरोळ / प्रतिनिधी
शिरोळ येथील शिवशक्ती कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळातर्फे सर्व शिवभक्तांसाठी गुरुवार, दिनांक २६ नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी ठीक ६.३० वाजता प्रेरणादायी आणि ज्ञानवर्धक ‘शिवकालीन संवाद’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम मंडळाच्या सभागृहात, वॉर्ड क्रमांक १० येथे पार पडणार आहे.या कार्यक्रमासाठी प्रख्यात शिवव्याख्याते श्री उदय आडके सर प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार आहेत. ‘शिवकालीन संवाद’ या विषयातून ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनकार्याचा सखोल आढावा घेणार आहेत. छत्रपतींचा इतिहास, स्वराज्याची कार्यपद्धती, पराक्रम, प्रभावी प्रशासन व्यवस्था, गड-किल्ल्यांचे महत्त्व, युद्धनीती तसेच शिवकालातील अनेक अज्ञात व रोचक पैलूंवर ते मार्गदर्शन करणार आहेत.या संवादात्मक कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे उपस्थितांना आपल्या मनातील शिवकालीन प्रश्न थेट विचारण्याची संधी मिळणार आहे. “प्रश्न तुमचे… उत्तर उदय आडके सरांचे!” या संकल्पनेतून इतिहास अधिक जिवंत आणि समजण्यास सुलभ होणार आहे. शिवचरित्रातून प्रेरणा घेण्यासाठी, स्वराज्याचा इतिहास नव्याने जाणून घेण्यासाठी आणि पुढील पिढीपर्यंत अभिमानाचा हा वारसा पोहोचवण्यासाठी हा कार्यक्रम उपयुक्त ठरणार आहे. कार्यक्रमासाठी महिलांसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. सर्व शिवभक्त, युवक-युवती तसेच इतिहासप्रेमीची उपस्थितीच आमच्यासाठी प्रेरणा आहे,” असे सांगत नागरिकांना वेळेवर उपस्थित राहण्याचे आवाहन असे आवाहन नगरसेवक सचिन शिंदे यांनी केले आहे.