“संपूर्ण गाव एकवटलं” ल.क.अकीवाटे औद्योगिक वसाहत पाणी प्रदूषणाविरोधात अर्जुनवाड ग्रामस्थ आक्रमक, गाव बंद ठेवून निषेध 

Spread the love

जयसिंगपूर / प्रतिनिधी 

जयसिंगपूर येथील ल.क.अकीवाटे औद्योगिक वसाहतीमधून सोडण्यात येणारे प्रदूषित सांडपाणी थेट कृष्णा नदी पात्रात मिसळत असल्याने नदीकाठावरील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न अत्यंत गंभीर बनला आहे.या भीषण प्रदूषणाविरोधात अर्जुनवाड ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेत मंगळवार दिनांक २४ फेब्रुवारी रोजी सकाळपासून संपूर्ण गाव बंद ठेवत तीव्र निषेध नोंदविला.सोमवारी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (कोल्हापूर विभाग) यांच्या अधिकाऱ्यांनी अर्जुनवाडसह परिसराची पाहणी करून नदीत मिसळणाऱ्या सांडपाण्याची तपासणी केली.यावेळी संतप्त ग्रामस्थांनी प्रदूषणास जबाबदार असलेल्या उद्योगांवर तात्काळ आणि कडक कारवाई करण्याची मागणी लावून धरली.अधिकाऱ्यांना घटनास्थळीच रोखून धरत कारवाईचे ठोस आश्वासन मिळाल्याशिवाय मागे हटणार नसल्याचा इशारा देण्यात आला.आज प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी, ग्रामस्थ प्रतिनिधी आणि औद्योगिक वसाहतीतील कंपन्यांची संयुक्त बैठक घेण्यात येणार असून, यामध्ये सांडपाणी प्रक्रिया यंत्रणा तातडीने दुरुस्त करून प्रदूषण रोखण्याबाबत तोडगा काढण्यासाठी चर्चा होणार आल्याचे सांगण्यात आले. मात्र, केवळ आश्वासनांवर ग्रामस्थ समाधानी नसून प्रत्यक्ष अंमलबजावणी होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.प्रदूषित पाण्यामुळे कॅन्सरसारख्या गंभीर आजारांचे प्रमाण वाढत असल्याचा गंभीर आरोप नागरिकांनी केला आहे.संबंधित उद्योगांवर फौजदारी गुन्हे दाखल करून दोषी यंत्रणा सील करावी,तसेच प्रोसेस युनिट तात्काळ बंद करावीत,अशी ठाम मागणी करण्यात आली आहे.या मागणीसंदर्भात ल क अकीवाटे इंडस्ट्रीज व प्रदूषण मंडळाला पत्रही देण्यात आले आहे.दरम्यान, प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी तातडीने हस्तक्षेप करून नागरिकांच्या आरोग्याचे रक्षण करावे,अन्यथा आंदोलन तीव्र करण्यात येईल, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!