राजापूर / प्रतिनिधी
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी आणि उज्ज्वल भविष्यासाठी राजापूर ग्रामस्थांनी एक अभिनव आणि प्रेरणादायी उपक्रम हाती घेतला आहे.आजपासून दररोज संध्याकाळी ठीक ७ वाजता गावात “अभ्यासाचा जयघोष” म्हणून भोंगा वाजवण्यात येणार आहे.या संकेतामुळे विद्यार्थ्यांनी पुढील दोन तास पूर्णपणे अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे,असा संदेश देण्यात येत आहे.या उपक्रमामागील मुख्य उद्देश म्हणजे विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी शांत आणि एकाग्र वातावरण उपलब्ध करून देणे हा आहे. संध्याकाळी ७ ते ९ या वेळेत घरातील सुज्ञ व जागरूक माता-पित्यांनी मोबाईलचा वापर टाळावा,टीव्ही बंद ठेवावा आणि आपल्या पाल्याला अभ्यासासाठी प्रोत्साहन द्यावे, अशी कळकळीची विनंती करण्यात आली आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या वाढत्या वापरामुळे विद्यार्थ्यांचे लक्ष विचलित होत असल्याचे चित्र दिसून येते.या पार्श्वभूमीवर संपूर्ण गावाने एकत्र येत घेतलेला हा निर्णय निश्चितच कौतुकास्पद ठरत आहे. राजापूर ग्रामपंचायतीच्या पुढाकारातून आणि ग्रामस्थांच्या सक्रिय सहभागातून हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. गावातील सर्व प्रतिष्ठित नागरिकांनीही या संकल्पनेला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. संध्याकाळी ७ नंतर जर एखादा विद्यार्थी घराबाहेर दिसला, तर त्याला प्रेमाने व समज देऊन अभ्यासासाठी घरी पाठवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.शिक्षणाबाबतची ही सामूहिक जबाबदारी गावाच्या एकजुटीचे द्योतक आहे.या स्तुत्य उपक्रमासाठी गुरुदत्त शुगर्स चे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर राहूल घाटगे यांचे विशेष सहकार्य लाभले आहे. तसेच राजापूर ग्रामपंचायत आणि मार्गदर्शक म्हणून विठ्ठल ढवळे यांचेही मोलाचे योगदान आहे. त्यांच्या पाठबळामुळे हा उपक्रम अधिक प्रभावीपणे राबवला जात आहे.“अभ्यासाचा जयघोष” ही केवळ घंटानादाची कृती नसून, विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी उचललेले एक सामूहिक पाऊल आहे.संपूर्ण गावाने शिक्षणाला प्राधान्य देत घेतलेली ही भूमिका इतर गावांसाठीही प्रेरणादायी ठरणार आहे. राजापूरच्या या अभिनव उपक्रमामुळे विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता निश्चितच उंचावेल,असा विश्वास व्यक्त केला जात आहे.