पहाटेच्या सुमारास दोन पिकअप गाड्यांमधून गोवंशीय जनावरांची अवैध वाहतूक उघड

Spread the love

पुलाची शिरोली प्रतिनिधी / कुबेर हंकारे 

पुलाची शिरोली गावाजवळील पुणे–बेंगळुरू महामार्गावर पहाटेच्या सुमारास गोवंशीय जनावरांची अवैध वाहतूक करणाऱ्या दोन पिकअप गाड्यांवर कारवाई करण्यात आली. या कारवाईत एकूण आठ बैल जप्त करण्यात आले असून दोन चालकांवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक १९ फेब्रुवारी २०२६ रोजी पहाटे सुमारे ३ वाजण्याच्या सुमारास दोन पिकअप वाहनांमधून गोवंशीय जनावरे कर्नाटक राज्यात कत्तलीसाठी नेली जात असल्याची माहिती श्रीकांत कदम , निलेश शिंदे,शुभम थोरवत, राहुल मोरे हर्षद देशपांडे व त्यांच्या सहकाऱ्यांना मिळाली होती. त्यानुसार या सर्वांनी सापळा रचून संबंधित वाहनांना थांबवले. तपासणीदरम्यान एका पिकअप गाडीमध्ये तीन बैल तर दुसऱ्या गाडीत पाच बैल आढळून आले.वाहन क्रमांक MH-08-W-2023 व MH-47-Y-4555 या गाड्यांमधून जनावरांची अत्यंत अमानुष पद्धतीने वाहतूक केली जात असल्याचे दिसून आले. जनावरांना घट्ट बांधून, गर्दीच्या अवस्थेत कोंबण्यात आले होते. त्यांच्यासाठी कोणतीही योग्य व्यवस्था करण्यात आलेली नव्हती. प्राथमिक चौकशीत चालकांनी उडवाउडवीची उत्तरे दिली.या प्रकरणी वाहन चालक राहुल वासु दुर्गे (वय २८, रा. इस्लामपूर, जि. सांगली) आणि कुमार शंकर कोकणे (वय ३३, रा. आप्पाचिवाडी, ता. निपाणी, जि. बेळगाव) यांच्यावर प्राण्यांवरील क्रूरता प्रतिबंध अधिनियम १९६० चे कलम ११(१)(ड), महाराष्ट्र पशुसंवर्धन अधिनियम १९७६ चे कलम ५, ५(ए), ५(बी), ९(अ), १० तसेच मोटार वाहन अधिनियम १९८८ चे कलम १०४, १९२(ए) आणि महाराष्ट्र पोलिस अधिनियम १९५१ चे कलम ११९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.जप्त करण्यात आलेली जनावरे सुरक्षित स्थळी हलविण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. या कारवाईमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!