पुलाची शिरोली प्रतिनिधी / कुबेर हंकारे
पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर नागाव फाटा येथे कोल्हापूर स्टील समोर कार च्या धडकेत मोटारसायकल स्वार जखमी झाला. हि घटना गुरुवारी सायंकाळी पाच वाजता घडली. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की,शिवाजी कदम रा.पुलाची शिरोली असे जखमीचे नाव आहे.कदम यांचा आयशर टेम्पो आहे.ते सायंकाळी पाच वाजता काम आटोपल्यानंतर ते आपला टेम्पो शिरोली एमआयडीसी येथे पार्किंग करून हिरोहोंडा मोटारसायकलवरून घरी निघाले होते. नागाव फाटा येथे कोल्हापूर स्टील समोर आले असता पुण्याहून आपल्या कुटूंबियासमवेत राहुल पाटील,रा.कळंबा हे आपल्या कार मधून निघाले होते. त्यांना महामार्गावरील दुभाजकाचा अंदाज न आल्याने दुभाजक चुकवायच्या नादात त्यांनी शिवाजी यांच्या दुचाकी ला मागून धडक दिली. या धडकेत शिवाजी हे हवेत उडून स्विफ्ट गाडीच्या बोनेट वर पडून जखमी झाले. तर त्यांची मोटारसायकल सुमारे दोनशे फूट फरफटत जाऊन सेवा रस्त्यावर पार्किंगला उभ्या असणाऱ्या टेम्पोला धडकली. या अपघातात शिवाजी कदम हे जखमी झाले तर मोटारसायकल व कार गाडीचे नुकसान झाले आहे. नशीब बलवत्तर म्हणून कदम वाचले, अन्यथा मोठा अनर्थ घडला असता.घटनेनंतर कदम यांच्या नातेवाईकांनी कार चालकास मारहाण केली.मारहाण केल्यामुळे राहुल हे कुटूंबीयांसोबत असल्याने भयभीत झाले होते.जखमीस उपचारासाठी शिरोली येथील खाजगी दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे.