पुलाची शिरोली प्रतिनिधी / कुबेर हंकारे
शिरोली पुलाची (ता. हातकणंगले) येथे महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात व भक्तिभावाने साजरी करण्यात आली. ग्रामपंचायत शिरोली पुलाची यांच्या वतीने विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करून शिवरायांना अभिवादन करण्यात आले.संपूर्ण गावात आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.कार्यक्रमाची सुरुवात पंचायत समिती सदस्या सौ. कमल कौंदाडे आणि लोकनियुक्त सरपंच सौ. पद्मजा करपे यांच्या हस्ते विधिवत पाळणा पूजनाने झाली.यावेळी ग्रामपंचायत महिला सदस्यांनी पारंपरिक पाळणा गीत सादर करत वातावरण शिवमय केले.उपस्थित ग्रामस्थांनी “जय भवानी, जय शिवाजी”च्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला.कोल्हापूर दक्षिणचे आमदार अमल महादेवराव महाडिक यांनी ग्रामपंचायत प्रांगणातील शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. ग्रामपंचायत सदस्या प्रतिनिधी शिवाजी समुद्रे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवण्यात आले. तसेच छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात उपसरपंच अविनाश कोळी यांनी शिवरायांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला, तर जिल्हा परिषद सदस्य सलीम महात यांच्या हस्ते श्रीफळ वाढवण्यात आले.यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतातून शिवरायांच्या विचारांचे अनुकरण करण्याचे आवाहन केले. तरुण पिढीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रम, धैर्य आणि स्वाभिमानाचा आदर्श घेऊन देशाच्या प्रगतीसाठी योगदान द्यावे, असे मत व्यक्त करण्यात आले. शिवरायांनी स्थापन केलेल्या स्वराज्याच्या संकल्पनेतून समाजाला एकतेचा आणि स्वाभिमानाचा संदेश मिळतो, असेही वक्त्यांनी नमूद केले.या सोहळ्याप्रसंगी लोकनियुक्त सरपंच सौ. पद्मजा करपे, उपसरपंच विजय जाधव, सदस्य सलीम महात, पंचायत समिती सदस्या सौ. कमल कौंदाडे, ग्रामविकास अधिकारी सौ. गीता कोळी, माजी उपसरपंच कृष्णात करपे, संजय पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष सतीश पाटील, विठ्ठल पाटील, डॉ. सुभाष पाटील, दिलीप कौंदाडे तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य, तंटामुक्त समितीचे सदस्य, विविध संस्थांचे पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.एकूणच शिरोली पुलाची येथील छत्रपती शिवाजी महाराज जयंती सोहळा भक्ती, एकता आणि उत्साहाच्या वातावरणात संपन्न झाला.