शिरोळमध्ये कचरा डेपोचा प्रदूषित धुरामुळे नागरिकांचा संताप उसळला, ‘गांधीगिरी’ पद्धतीने लक्ष वेधणार 

Spread the love

शिरोळ / प्रतिनिधी 

शिरोळ शहरातील दसरा चौक येथील कचरा डेपोला वारंवार लागणाऱ्या आगीमुळे परिसरात प्रदूषित धुर पसरत असून लहान मुले, महिलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्वांनाच श्वसनाच्या गंभीर तक्रारींना सामोरे जावे लागत आहे.विशेषतः प्रभाग क्रमांक दहा मधील रहिवासी गेल्या अनेक वर्षापासून या समस्येने हैराण झाले आहेत.मात्र वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.या संदर्भात शिरोळ नगर परिषदच्या आरोग्य विभागासह लोकप्रतिनिधींना लेखी व तोंडी सूचना देण्यात आल्या.तरीही कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही.पूर्वी कचरा रात्रीच्या वेळी पेटवला जात होता; मात्र आता दिवसा ढवळ्या कचरा जाळण्याचे प्रकार सुरू असून नागरिकांच्या आरोग्याशी थेट खेळ केला जात असल्याची तीव्र भावना व्यक्त होत आहे.प्रभाग क्रमांक दहा मध्ये असलेल्या या डेपोमुळे संपूर्ण परिसर धुराच्या विळख्यात सापडतो. अनेकांना दमा,खोकला,डोळ्यांची जळजळ, श्वास घेण्यास त्रास अशा तक्रारी वाढल्या आहेत. शाळकरी मुलांचे आरोग्य धोक्यात आले असून वयोवृद्ध नागरिकांना रुग्णालयात दाखल व्हावे लागत असल्याची माहिती स्थानिकांनी दिली.यापूर्वीच्या नगराध्यक्ष व नगरसेवकांनी या समस्येकडे दुर्लक्ष केल्यामुळे सत्तांतर घडवून बदल घडवून आणला.मात्र नव्या पदाधिकाऱ्यांकडूनही केवळ पाहणीचे नाटक होत असल्याचा आरोप होत आहे. “हाताची घडी, तोंडावर बोट” अशी भूमिका घेत चारही नगरसेवक शांत बसले आहेत,अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांतून उमटत आहे.या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक दहा मधील नागरिकांनी आक्रमक भूमिका घेतली असून नगरपरिषदेच्या प्रथम लोकनियुक्त नगराध्यक्ष,आरोग्य सभापती आणि संबंधित नगरसेवकांचा ‘गांधीगिरी’ पद्धतीने सत्कार करून निषेध नोंदवण्याचा निर्धार केला आहे. समस्या तत्काळ मार्गी लावली नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.कचरा व्यवस्थापनाचा प्रश्न सोडवण्यात प्रशासन अपयशी ठरत असल्याने भविष्यात मोठा संघर्ष उभा राहण्याची शक्यता व्यक्त होत आहे.नागरिकांच्या संयमाचा बांध तुटण्याआधी नगरपरिषद जागी होणार का,असा सवाल आता उपस्थित होत आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!