विकासासाठी नगरसेवकांची सकारात्मक भूमिका, शिरोळ पालिकेच्या विशेष सभेत विविध विकास कामांना मंजुरी

Spread the love

शिरोळ / प्रतिनिधी

शहराच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या विविध कामांना मंगळवारी झालेल्या शिरोळ नगरपालिका विशेष सभेत सर्वानुमते मंजुरी देण्यात आली.शहरातील मूलभूत सुविधांच्या उभारणीसह स्वच्छता,पाणीपुरवठा, आरोग्य आणि सामाजिक सुविधांवर भर देणारे अनेक निर्णय या बैठकीत घेण्यात आले.पालिकेच्या दिनबंधू दिनकररावजी यादव सभागृहात प्रथम लोकनियुक्त महिला नगराध्यक्षा सौ.योगिता कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा पार पडली. उपनगराध्यक्ष पृथ्वीराजसिंह यादव व मुख्याधिकारी निशिकांत प्रचंडराव यांची प्रमुख उपस्थिती होती.जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजनेअंतर्गत बोलावण्यात आलेली ही विशेष सर्वसाधारण सभा खेळीमेळीत आणि सकारात्मक वातावरणात संपन्न झाली.सभेत महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान योजनेअंतर्गत शहरातील आरोग्य व स्वच्छता व्यवस्थेला बळकटी देण्याचा निर्णय घेण्यात आला.प्रत्येक प्रभागात एक घंटागाडी उपलब्ध करून देणे तसेच आवश्यक स्वच्छता साहित्य खरेदी करण्यास मंजुरी देण्यात आली.यामुळे कचरा संकलन अधिक कार्यक्षम होणार असून शहर स्वच्छतेकडे एक मोठे पाऊल टाकले जाणार आहे.उन्हाळ्यात उद्भवणाऱ्या पाणीटंचाईचा विचार करून शहरातील आवश्यक ठिकाणी नवीन कुपनलिका खोदण्यास तसेच नादुरुस्त कुपनलिकांची दुरुस्ती करून त्यांना क्रमांक देण्याचा निर्णय घेण्यात आला.नागरिकांना नियमित व सुरळीत पाणीपुरवठा करण्यासाठी ही कामे तातडीने हाती घेण्यात येणार आहेत.कल्लेश्वर तलाव येथे विद्युत व्यवस्था उभारणे व दुरुस्तीची अनुषंगिक कामे करण्यास मान्यता देण्यात आली.तसेच वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत ‘नमो उद्यान’ विकसित करण्यासाठी कल्लेश्वर तलाव परिसरासह शहरातील अन्य दोन ठिकाणांची निवड करण्याचा निर्णय घेण्यात आला.या प्रकल्पामुळे नागरिकांना विरंगुळा व आरोग्यदायी वातावरण उपलब्ध होणार आहे.नागरी दलितोत्तर जिल्हास्तर योजनेतून प्रभाग क्रमांक आठमध्ये काळे समाज सार्वजनिक तालीम व व्यायाम शाळा सभागृह बांधणे तसेच संबंधित अनुषंगिक कामे करण्यास मंजुरी देण्यात आली.प्रभाग क्रमांक दहामध्ये हनुमान तालीम मंडळ येथे सार्वजनिक तालीम व व्यायाम शाळा सभागृह उभारण्यात येणार आहे. श्रीराम मंडळ सांस्कृतिक हॉलसाठी संरक्षक भिंत बांधण्याचाही निर्णय घेण्यात आला.अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजनेतून प्रभाग क्रमांक दोनमध्ये चर्मकार समाजासाठी स्मशानभूमीत दहन शेड बांधणे,बैठक व्यवस्था व इतर पूरक कामे करण्यास हिरवा कंदील देण्यात आला.तसेच पंचगंगा नदीकाठावरील कै. हैबतराव मल्हारराव जगदाळे सार्वजनिक स्मशानभूमीतील दहन शेड दुरुस्ती,विद्युत व्यवस्था व रंगरंगोटी करण्याचा निर्णय घेण्यात आला.शहरातील प्रमुख ठिकाणी हायमॅक्स दिवे व स्ट्रीट लाईट बसवून प्रकाशव्यवस्था मजबूत करण्याचेही ठरविण्यात आले.आण्णा बाळू पुजारी घर ते सखाराम बाळू पुजारी घर रस्ता व गटर्स बांधकामास मंजुरी देण्यात आली.उपनगराध्यक्ष पृथ्वीराजसिंह यादव यांनी शहरात विविध योजना प्रभावीपणे राबवून रखडलेली कामे मार्गी लावण्यासाठी सर्वानुमते निर्णय घेतल्याचे सांगितले.शहराच्या विकासासाठी सर्व सदस्यांनी सकारात्मक भूमिका घेतल्याचे त्यांनी नमूद केले.या विशेष सभेला स्वच्छता,वैद्यक व आरोग्य सभापती विजय आरगे,बांधकाम सभापती सौ.अनिता संकपाळ,महिला व बालकल्याण सभापती सौ.कल्पना काळे, उपसभापती सौ.अनुराधा गुरव,नगरसेविका सौ.सुवर्णा कांबळे, सौ.सविता पुजारी,सौ.रेखा कोरे,सौ विदुला यादव, सौ.दिपाली फल्ले, सौ.श्वेता जाधव,सौ.शिवानी कांबळे,नगरसेवक दीपक भाट,राहुल कोळी,ओंकार माने गावडे,सचिन शिंदे,अमरसिंह शिंदे,शाहुल कोळी यांनी सहभाग घेतला.या सभेस सर्व नगरसेवक नगरसेविका विभाग प्रमुख आणि अधिकारी उपस्थित होते.शहराच्या विकासासाठी एकमताने घेतलेल्या निर्णयांमुळे आगामी काळात शिरोळ शहराच्या पायाभूत सुविधांमध्ये लक्षणीय सुधारणा होणार असल्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!