शिरोळ / प्रतिनिधी
देशभरात आज महाशिवरात्रीचा पवित्र उत्सव भक्तिभावाने साजरा होत असून सर्वत्र ‘हर हर महादेव’च्या जयघोषाने वातावरण दुमदुमले आहे.शिरोळ येथील श्री कलेश्वर मंदिर येथे पहाटेपासूनच भाविकांची मोठी गर्दी उसळली आहे. मंदिर परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली असून फुलांनी सजावट करण्यात आली आहे.पहाटे मंगल आरतीने धार्मिक कार्यक्रमांची सुरुवात झाली. त्यानंतर अभिषेक, रुद्राभिषेक आणि महापूजा विधी संपन्न झाले.भाविकांनी बिल्वपत्र, दूध, दही, मध आणि गंगाजल अर्पण करून भगवान शंकराचे दर्शन घेतले. दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागल्या होत्या. मंदिर प्रशासनाच्या वतीने भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याची व प्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती. पोलिस बंदोबस्तही ठेवण्यात आला होता. महाशिवरात्रीच्या दिवशी उपवास आणि रात्रभर जागरण करण्याला विशेष महत्त्व आहे.धार्मिक श्रद्धेनुसार,याच दिवशी भगवान शिव आणि माता पार्वती यांचा विवाह झाला होता.त्यामुळे विवाहित तसेच अविवाहित महिलांनी विशेष पूजाविधी करून कुटुंबाच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना केली.दरवर्षीप्रमाणे यंदाही कलेश्वर मंदिरात भाविकांची मोठी उपस्थिती पाहायला मिळाली.भक्तिमय वातावरणात आणि शिवनामाच्या गजरात महाशिवरात्रीचा उत्सव उत्साहात साजरा होत आहे. महाशिवरात्रीनिमित्त श्री कल्लेश्वर मंदिर व्यवस्थापन यांच्या वतीने अभिजीत गुरव शक्तीजीत गुरव व गुरव कुटुंब यांनी उत्तम नियोजन केले होते.