सभासद शेतकऱ्याला शिवीगाळ; संचालकावर कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा

Spread the love

शिरोळ / प्रतिनिधी 

शिरोळ येथील सभासद शेतकरी राहुल माने यांना अर्वाच्य शिवीगाळ व दमदाटी केल्याच्या आरोपावरून श्री दत्त साखर कारखान्याचे संचालक दरगु गावडे यांना तात्काळ पदावरून हटविण्याची मागणी आंदोलन अंकुश संघटनेने केली आहे.कारवाई न झाल्यास कारखान्याच्या प्रवेशद्वारावर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा संघटनेचे अध्यक्ष धनाजी चुडमुंगे यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.मिळालेल्या माहितीनुसार, शिरोळ येथील सभासद शेतकरी राहुल माने यांनी ऊस तोडीसंदर्भात कारखान्याचे माजी चेअरमन गणपतदादा पाटील यांना दूरध्वनीवर संपर्क साधला होता.याच कारणावरून संचालक दरगु गावडे यांनी माने यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून दमदाटी केल्याचा आरोप आहे.या प्रकरणी राहुल माने यांनी संबंधितांविरोधात पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.दरम्यान,शेतकऱ्याला शिवीगाळ करणाऱ्या संचालकावर कारवाई करावी,अशी मागणी यापूर्वीही कारखाना प्रशासनाकडे लेखी निवेदनाद्वारे करण्यात आली होती.त्यावेळी जिल्हा परिषद निवडणुका झाल्यानंतर निर्णय घेऊ,असे आश्वासन देण्यात आले होते.मात्र निवडणुका पार पडूनही अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही,असे संघटनेने नमूद केले आहे.ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या कष्टावर साखर कारखानदारी उभी आहे.अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनाच अपमानास्पद वागणूक दिली जात असल्यास ते सहन केले जाणार नाही,असे धनाजी चुडमुंगे यांनी स्पष्ट केले.संबंधित संचालकाला तात्काळ पदावरून दूर करून योग्य ती चौकशी व कारवाई करावी, अन्यथा कारखान्याच्या दारात आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात येईल,असा इशाराही त्यांनी दिला आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!