भरधाव कंटेनरने धडक दिल्याने २५ वर्षीय विवाहितेचा जागीच मृत्यू, पती गंभीर जखमी

Spread the love

पुलाची शिरोली प्रतिनिधी / कुबेर हंकारे

कोल्हापुरातून पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरून आपल्या गावी रेठरे बुद्रुक कडे जाणाऱ्या मोटरसायकल वरील पती-पत्नी ना भरधाव कंटेनर ने धडक दिल्याने कंटेनरच्या चाकाखाली येऊन मोटरसायकलवरील 25 वर्षीय श्वेता अक्षय चव्हाण यांचा जागीच मृत्यू झाला तर त्यांचे पती अक्षय चव्हाण गंभीर जखमी झाले.हा अपघात आज सायंकाळी सहा दरम्यान टोप इथं झाला.सांगली जिल्ह्यातील रेठरे बुद्रुक इथले 27 वर्षीय अक्षय चव्हाण आणि 25 वर्षीय त्यांची पत्नी श्वेता अक्षय चव्हाण हे दाम्पत्य कोल्हापूर मध्ये एका खाजगी कंपनीत नोकरी करत होते.नेहमीप्रमाणे सुट्टी झाल्यानंतर ते आपल्या मोटरसायकल क्रमांक एम एच 10 सी 0856 वरून पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरून आपल्या गावी रेठरे बुद्रुक इथे निघाले होते. ते सहाच्या दरम्यान टोप इथल्या महाडिक वसाहती समोर आले असता पुण्याच्या दिशेने जाणारा भरदाव आयशर टेम्पो क्रमांक MH 14 – 9144 ने त्यांना जोराची धडक दिली.यामध्ये मोटरसायकल वरील श्वेता चव्हाण या चाकाखाली सापडल्या आयशर त्यांच्या अंगावरून गेल्याने त्यांच्या शरीराचा अक्षरशः चेदा-मेंदा झाला होता.तर अक्षय चव्हाण हे देखील गंभीर जखमी झाले.धडक देऊन आयशर चालक पळून गेला होता त्याचा टेम्पो परिसरातील नागरिकांनी पाठलाग करून संभापूर जवळ आडवला.गंभीर जखमी अक्षय चव्हाण यांना उपचारासाठी सीपीआर मध्ये दाखल करण्यात आले आहे. या अपघातामुळे वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली होती.तर टोप जवळील पेटवडगाव कडे जाणारा सर्विस रोड रस्त्याच्या कामामुळे अनेक महिने झाले बंद आहे त्यामुळे या ठिकाणी अपघाताचे प्रमाण वाढले असून अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे या परिसरातील दोन्ही बाजूचे सर्विस रोड तात्काळ सुरू करावेत अशी मागणी होत आहे. या अपघाताची माहिती मिळताच शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न करत होते. या अपघाताची नोंद रात्री उशिरा शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!