शिरोळ / प्रतिनिधी
शिरोळ तालुका पंचायत समितीच्या सभापतीपदी मिलिंद कुरणे यांची वर्णी लागण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे.आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या नेतृत्वाखालील राजर्षी शाहू आघाडीने पंचायत समिती निवडणुकीत दमदार कामगिरी करत 14 पैकी तब्बल 10 जागांवर विजय मिळवून एकहाती सत्ता स्थापन केली आहे. त्यामुळे सभापतीपदासाठी आघाडीचा दावा भक्कम मानला जात आहे.पंचायत समितीचे सभापती पद यंदा मागासवर्गीय गटासाठी आरक्षित आहे.या गटातून निवडून आलेले मिलिंद कुरणे हे यड्रावकर गटाचे एकमेव सदस्य असल्याने त्यांच्या नावाची चर्चा आघाडीवर आहे.अब्दुल लाट पंचायत मतदारसंघातून ते विजयी झाले असून स्थानिक पातळीवर त्यांनी संघटनात्मक बांधणी मजबूत केली आहे. जिल्हा परिषद पातळीवरही राजर्षी शाहू आघाडीने चांगली कामगिरी केली आहे. आघाडीने सात पैकी चार जागा जिंकल्या आहेत.या विजयामध्ये खासदार धैर्यशील माने आणि माजी आमदार उल्हास पाटील यांचेही नेतृत्व महत्त्वाचे ठरले. दुसरीकडे,काँग्रेसचे गणपतराव पाटील,माजी खासदार राजू शेट्टी तसेच महाविकास आघाडीला जिल्हा परिषदेत दोन जागा मिळाल्या,तर भाजपला एक जागा मिळाली आहे.पंचायत समिती निवडणुकीत महाविकास आघाडीला चार जागांवर समाधान मानावे लागले.राजर्षी शाहू आघाडीने मिळवलेल्या स्पष्ट बहुमतामुळे सभापती निवड बिनविरोध होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.अंतिम निर्णय आमदार यड्रावकर यांच्या गटाच्या बैठकीत होणार असून,कुरणे यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची दाट शक्यता आहे.शिरोळ तालुक्यातील सत्तेचे समीकरण स्पष्ट झाल्याने आता विकासकामांना गती मिळणार का,याकडे नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे.