११ वर्षांच्या पै.विघ्नेश गायकवाडची ८०० सलग सपाटे मारून विक्रमी कामगिरी,आवळे फाउंडेशन कडून कौतुक 

Spread the love
शिरोळ / प्रतिनिधी 
कोल्हापूर येथील साद अत्तार फाउंडेशनच्या वतीने “सपाटे श्री” ही खुल्या गटातील अनोखी व आव्हानात्मक स्पर्धा नुकतीच यशस्वीपणे पार पडली. या स्पर्धेत सलग ८०० सपाट्या मारण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते.या कठीण स्पर्धेत पै.विघ्नेश प्रथमेश गायकवाड याने सहभाग नोंदवत अवघ्या ५४ मिनिटे ५३ सेकंदांत सलग ८०० सपाट्या मारून स्पर्धा यशस्वीरीत्या पूर्ण केली.विशेष बाब म्हणजे पै. विघ्नेश गायकवाड यांचे वय अवघे अकरा वर्षे असून, इतक्या कमी वयात त्यांनी दाखवलेली जिद्द, चिकाटी आणि शारीरिक क्षमता सर्वांनाच थक्क करणारी ठरली. सातत्य, मेहनत आणि आत्मविश्वासाच्या जोरावर त्यांनी ही कामगिरी साध्य करत तरुण पिढीसमोर आदर्श निर्माण केला आहे.या उल्लेखनीय यशाबद्दल पै. विघ्नेश गायकवाड यांचा गोविंद बंडू आवळे फाउंडेशन, तेरवाड, शिवसेना (एकनाथ शिंदे गट) तेरवाड अध्यक्ष, यड्रावकर सोशल फाउंडेशन, तेरवाड तसेच मातंग समाज, गंगापूर यांच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला. मान्यवरांनी त्यांचा शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन गौरव केला तसेच त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी बोलताना मान्यवरांनी सांगितले की, विघ्नेशसारखे खेळाडू ग्रामीण भागातील तरुणांसाठी प्रेरणास्थान असून, अशा स्पर्धांमुळे पारंपरिक खेळांना चालना मिळते. पै. विघ्नेश गायकवाड याच्या या यशामुळे परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून सर्व स्तरातून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!