शिरोळ तालुक्याची वाटचाल मेडिकल ‘हब’कडे : आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर 

Spread the love

अर्जुनवाड येथे राजर्षी शाहू विकास आघाडीची सभा संपन्न 

अर्जुनवाड / प्रतिनिधी 

शिरोळ तालुका आरोग्य सुविधांच्या दृष्टीने ‘मेडिकल हब’ म्हणून विकसित करण्याच्या दिशेने ठोस पावले टाकली जात असून, त्या दृष्टीने विविध महत्त्वाची कामे सध्या सुरू आहेत. ९०० बेडसहित ग्रामीण रुग्णालयांचे अत्याधुनिक रूपांतर, तसेच सीटी-स्कॅन, एक्स-रे, प्रस्तावित कॅन्सर रुग्णालय, पश्चिम महाराष्ट्रातील अत्याधुनिक मनोरुग्णाल यासह ग्रामीण रुग्णालयात सोनोग्राफीसारख्या सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर दिला जात आहे. आपत्कालीन उपचारांसाठी आवश्यक असलेली प्राथमिक सेवा पहिल्या एका तासात मिळावी, यासाठी तालुक्यातील आरोग्य यंत्रणा सक्षम केली जात आहे. यासोबतच उपकेंद्रे, प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि विशेष उपचार सुविधा बळकट करून नागरिकांना इचलकरंजी, सांगली किंवा कोल्हापूरकडे धाव घेण्याची गरज कमी करण्याचा प्रयत्न आहे. कर्करोग उपचार, मानसिक आरोग्य सेवा आणि रक्तसाठा केंद्र उभारणीसारख्या योजना राबविल्या जात असून, या सर्व उपक्रमांमुळे शिरोळ तालुका आरोग्य सेवांच्या बाबतीत स्वयंपूर्ण बनण्याच्या मार्गावर आहे. आरोग्य, सेवा आणि सुविधा यांचा समन्वय साधत शिरोळ तालुक्याचा ‘मेडिकल हब’ म्हणून उदय घडवण्याचे काम वेगाने सुरू आहे. असे प्रतिपादन आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी केले.अर्जुनवाड येथे राजर्षी शाहू विकास आघाडीच्या उमेदवारांच्या जाहीर सभेत ते बोलत होते.आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी आपल्या मनोगतात शिरोळ तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी आर्थिक सक्षमीकरण, पायाभूत सुविधा आणि रोजगारनिर्मिती या मुद्द्यांवर भर देत तालुक्यातील प्रत्येक कुटुंबाचे उत्पन्न कसे वाढेल, याचा सातत्याने विचार करून धोरणे राबवली जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. जाती-पाती, गट-तट, पक्षभेद बाजूला ठेवून केवळ विकास हा एकमेव अजेंडा घेऊन राजर्षी शाहू विकास आघाडी काम करत असल्याचे त्यांनी सांगितले.गेल्या सहा वर्षांत रस्ते दुरुस्ती व पायाभूत सुविधांसाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्यात आला. पाणंद रस्ते, ग्रामीण रस्ते, नळ पाणीपुरवठा योजना, सार्वजनिक सोयी-सुविधा यांमुळे शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळाला आहे. शेती क्षेत्रासाठी क्षारपड सिंचन योजना, क्षारपड जमिनी सुधारणा आणि शेतकऱ्यांना ८० टक्के अनुदानाच्या माध्यमातून आधार देण्यात आला आहे.तरुणांसाठी रोजगार निर्माण करण्यासाठी एमआयडीसी मंजुरी, औद्योगिक विकासावर भर देण्यात येत असून, स्थानिक पातळीवर नोकरीच्या संधी उपलब्ध करण्याचा प्रयत्न सुरू आहे. क्रीडा क्षेत्रासाठी तालुका क्रीडा संकुल, शिक्षण क्षेत्रात स्मार्ट जिल्हा परिषद शाळा, तसेच सांस्कृतिक ओळख जपण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकांची उभारणी करण्यात आली आहे.एकविचाराचे लोकप्रतिनिधी असतील तरच विकासाला गती मिळते, असा विश्वास व्यक्त करत, विकासासाठी एकजूट आणि सकारात्मक राजकारण आवश्यक असल्याचे आमदार यड्रावकर यांनी अधोरेखित केले.याप्रसंगी खासदार धैर्यशील दादा माने, माजी आमदार उल्हासदादा पाटील यांनी आपल्या मनोगतातून राजर्षी शाहू विकास आघाडीही शाहू महाराजांच्या विचारावर चालणारी आघाडी आहे.आघाडीचे सर्व उमेदवार सर्वसामान्य बहुजन समाजातील आहेत त्यामुळे शिरोळ तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांना निवडून द्यावे, असे आवाहन केले.याप्रसंगी जिल्हा परिषदेचे उमेदवार अमोल चव्हाण, पंचायत समितीचे उमेदवार सीमा म्हैशाळे,दिप्ती जाधव, पंचगंगा साखर कारखाना व्हा. चेअरमन बाबा पाटील, दिग्विजय पाटील, कुरुंदवाड उपनगराध्यक्ष दीपक गायकवाड,अभिजीत जगदाळे, चंद्रकांत मोरे, नंदकुमार पाटील, विकास पाटील, प्रदीप चौगुले सावकर, अर्चना थोरात, नंदाताई खोत, शोभा कोळी यांच्यासह राजर्षी शाहू विकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Comment

error: Content is protected !!