बिबट्याच्या हल्ल्यात बिऊर येथे ६ वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी अंत; खा.धैर्यशील माने यांची सांत्वनपर भेट

Spread the love

शिराळा / प्रतिनिधी 

शिराळा तालुक्यातील बिऊर गावात बिबट्याच्या हल्ल्यात सहा वर्षांचा निरागस मुलगा राजवीर हनुमंत पाटील याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली.या घटनेने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून पाटील कुटुंबाच्या दुःखात संपूर्ण गाव सहभागी झाले आहे.लहान वयातच राजवीरवर काळाने घाला घातल्याने नागरिकांमध्ये तीव्र हळहळ व्यक्त होत आहे.या पार्श्वभूमीवर आज आमदार सत्यजित भाऊ देशमुख यांच्या समवेत हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील माने यांनी राजवीरच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली.यावेळी त्यांनी पाटील कुटुंबाचे सांत्वन करत दुःखात सहभागी असल्याची भावना व्यक्त केली.राजवीरच्या निधनाने संपूर्ण समाज हादरून गेला आहे.अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी ठोस उपाययोजना करणे अत्यावश्यक आहे,असे खासदार माने यांनी सांगितले.या भेटीदरम्यान वनविभागाचे अधिकारी, ग्रामस्थ तसेच स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्याशी सविस्तर चर्चा करण्यात आली.चर्चेत या भागात बिबट्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याचे गंभीर वास्तव समोर आले.यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून लहान मुले, शेतकरी व महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.नागरिकांच्या सुरक्षिततेस प्राधान्य देत वाढलेल्या बिबट्यांच्या संख्येवर नियंत्रण आणण्यासाठी आवश्यक ते कायदेशीर बदल करून लोकाभिमुख कायदा करण्याचा प्रयत्न केला जाईल, अशी ठाम ग्वाही यावेळी देण्यात आली.तसेच वनविभागाने तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना, पिंजरे लावणे, गस्त वाढवणे व जनजागृती करण्याच्या सूचना देण्यात आल्या.यावेळी ज्येष्ठ नेते सुखदेव पाटील,तालुकाप्रमुख पृथ्वीसिंह नाईक, विनायक गायकवाड, प्रदीप पाटील, शहाजी पाटील, निलेश आवटे, आकाश पाटील, वनपरिक्षेत्र अधिकारी रमेश कांबळे यांच्यासह मोठ्या संख्येने स्थानिक नागरिक उपस्थित होते. या दुर्दैवी घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी प्रशासनाकडून ठोस व कायमस्वरूपी उपाययोजनांची मागणी केली आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!