शिरोळ / प्रतिनिधी
शिरोळ शहरातील नदीवेस परिसरातील दसरा चौक येथील नगरपरिषदेच्या कचरा डेपोला गेल्या आठ दिवसांपासून सातत्याने आग लागत असून,या आगीमुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.नगरपरिषदेचे कर्मचारी दररोज पेटलेला कचरा विझवण्याचा प्रयत्न करत असले तरी ही आग पूर्णपणे विझत नसल्याने नागरिकांमध्ये भीती व संभ्रमाचे वातावरण आहे.ही आग नेमकी का लागत आहे, यामागचे कारण अद्याप स्पष्ट न झाल्याने नागरिकांमध्ये संशय व्यक्त केला जात आहे.या कचरा डेपोमधून मोठ्या प्रमाणात निघणारा धूर रात्री ११ वाजल्यानंतर वाऱ्याच्या दिशेने दसरा चौक,जय शिवराय मंडळ,श्रीराम मंडळ व शिवशक्ती मंडळ या परिसरात पसरतो. परिणामी वयोवृद्ध नागरिक,महिला व लहान मुलांना श्वास घेण्यास त्रास होत असून श्वसनाचे आजार वाढताना दिसत आहेत.या गंभीर समस्येकडे नगरपरिषद व संबंधित प्रभागातील नगरसेवक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.निवडणूक काळात हा कचरा डेपो येथून हलवण्यात येईल तसेच परिसराला दुर्गंधीमुक्त करण्यात येईल,अशी आश्वासने नागरिकांना देण्यात आली होती.या आश्वासनांवर विश्वास ठेवून नागरिकांनी संबंधित नगरसेवकांना निवडून दिले.मात्र निवडून आल्यानंतर कचरा डेपो हलवणे तर दूरच, दररोज कचरा पेटत असून धुराचे लोट परिसरात पसरत आहेत.प्रभागातून निवडून आलेले एक नगरसेवक गणेशनगर तर दुसरे शाहूनगर येथे असल्याने त्यांना या दुर्गंधीचा व धुराचा प्रत्यक्ष त्रास होत नाही.त्यामुळे आमच्या आरोग्याची जबाबदारी कोण घेणार? असा संतप्त सवाल महिला वर्गातून उपस्थित केला जात आहे. तातडीने कचरा डेपो हलवावा व कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे.