जांभळी येथे रॉड-पाईपच्या हल्ल्यात जिम ट्रेनरची निर्घृण हत्या; परिसरात खळबळ

Spread the love
जांभळी / प्रतिनिधी 
जांभळी (ता. शिरोळ) येथे अज्ञात हल्लेखोरांनी लोखंडी रॉड व पाईपच्या साह्याने एका जिम ट्रेनरची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना बुधवारी (दि.२८) रात्री नऊच्या सुमारास घडली.या घटनेमुळे जांभळीसह जयसिंगपूर व शिरोळ परिसरात एकच खळबळ उडाली आहे.संदीप भाऊसो पाटील (वय ४२, रा. जांभळी) असे मृत जिम ट्रेनरचे नाव असून, ते व्यवसायाने जिम ट्रेनर होते.कुरडे मळा,जांभळी–जयसिंगपूर रिलायन्स पेट्रोल पंप रोड परिसरात अज्ञात हल्लेखोरांनी संदीप पाटील यांच्या डोक्यावर व शरीरावर लोखंडी रॉड व पाईपने जोरदार वार केले. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले असून, त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.हत्येनंतर आरोपींनी एमएच १४ एफसी ०९४५ क्रमांकाची इर्टिगा चारचाकी गाडी घटनास्थळीच सोडून पलायन केले. या गाडीत लोखंडी रॉड व कोयता आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. घटनास्थळाजवळ एक दुचाकी वाहन व अन्य साहित्यही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.घटनेची माहिती मिळताच जयसिंगपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सत्यवान हाके, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर यांच्यासह शिरोळ पोलीस घटनास्थळी दाखल झाले.पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला आहे.हत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून,वैयक्तिक वाद,आर्थिक व्यवहार किंवा अन्य कारणांमुळे ही हत्या झाली असावी, असा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे.आरोपींचा शोध घेण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम सुरू असून, लवकरच आरोपींचा छडा लागेल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.संदीप पाटील यांच्या निर्घृण हत्येमुळे जांभळी परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!