कुटवाडमधील युवा नेतृत्वाचा सीमा म्हैशाळे यांना जाहीर पाठिंबा; अर्जुनवाड मतदारसंघात राजकीय हालचालींना वेग

Spread the love

कुटवाड / प्रतिनिधी 

कुटवाड (ता. शिरोळ) येथील युवा नेते तथा माजी उपसरपंच विजय पाटील, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य उमेश खराडे,संदीप पाटील आणि अभिजीत पाटील यांनी आगामी पंचायत समिती निवडणुकीसाठी राजर्षी शाहू विकास आघाडी तसेच मित्र पक्षाच्या पंचायत समितीच्या उमेदवार सौ.सीमा जितेंद्र म्हैशाळे यांना जाहीर पाठिंबा दिला आहे.आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर व माजी आमदार उल्हास पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पाठिंबा जाहीर करण्यात आला.या पाठिंब्यामुळे अर्जुनवाड पंचायत समिती मतदारसंघात सीमा म्हैशाळे यांची ताकद वाढल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.कुटवाड परिसरात युवक वर्गात प्रभाव असलेले विजय पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांचा पाठिंबा मिळाल्याने प्रचाराला नवी ऊर्जा मिळाली आहे.यावेळी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी बोलताना सांगितले की,राजर्षी शाहू विकास आघाडी ही सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी सातत्याने कार्यरत आहे. विकासकामांना गती देण्यासाठी सक्षम,अभ्यासू आणि जनतेशी नाळ जुळलेले नेतृत्व पंचायत समितीत जाणे आवश्यक आहे.सौ.सीमा म्हैशाळे या उच्च शिक्षीत व अभ्यासू कार्यक्षम उमेदवार असून त्यांच्या विजयासाठी सर्वांनी एकजुटीने काम करावे,असे आवाहन त्यांनी केले.माजी आमदार उल्हास पाटील यांनीही आघाडीच्या धोरणांवर विश्वास व्यक्त करत कुटवाडसह संपूर्ण अर्जुनवाड मतदारसंघात परिवर्तनाची लाट असल्याचे नमूद केले.स्थानिक प्रश्न, शेती,पाणीपुरवठा,रस्ते,आरोग्य व शिक्षण यांसारख्या विषयांवर आघाडीने ठोस भूमिका घेतल्याने जनतेचा वाढता प्रतिसाद मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.युवा नेत्यांनीही यावेळी बोलताना सांगितले की,मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि पारदर्शक कारभारासाठी त्यांनी सीमा म्हैशाळे यांना पाठिंबा दिला आहे.येणाऱ्या निवडणुकीत हा पाठिंबा मतपेटीतून स्पष्टपणे दिसून येईल,असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.या घडामोडींमुळे अर्जुनवाड पंचायत समिती मतदारसंघातील राजकीय वातावरण अधिकच तापल्याचे दिसून येत आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!