पुलाची शिरोली प्रतिनिधी / कुबेर हंकारे
ट्विंकल स्टार इंग्लिश स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात आणि आनंदी वातावरणात पार पडले.यंदाच्या स्नेहसंमेलनासाठी ‘ऐतिहासिक’ ही संकल्पना केंद्रस्थानी ठेवण्यात आली होती. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणारा हा कार्यक्रम पालक, शिक्षक आणि मान्यवरांच्या उपस्थितीत रंगतदार झाला.कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी माजी सरपंच शशिकांत खवरे, संजीव कुलकर्णी, जिल्हा परिषद माजी सदस्य महेश चव्हाण, शिवाजी पोवार तसेच संस्थेचे अध्यक्ष संतोष बाटे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. सांस्कृतिक कार्यक्रमाची सुरुवात श्री गणेश वंदनाने करण्यात आली.नर्सरी ते इयत्ता पाचवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी नृत्य, गीत, समूहनृत्य व नाट्यप्रयोग सादर करून उपस्थितांची मने जिंकली. विद्यार्थ्यांनी सादर केलेली छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित ‘छावा’ ही नाटिका विशेष आकर्षण ठरली. या नाटिकेतून संभाजी महाराजांचे शौर्य, स्वाभिमान व बलिदान प्रभावीपणे मांडण्यात आले. डान्सर अमर यांच्या मार्गदर्शनाखाली ही नाटिका सादर करण्यात आली असून विद्यार्थ्यांच्या अभिनयाला प्रेक्षकांकडून भरभरून दाद मिळाली.कार्यक्रमात भारुडे व मराठी लोकगीतांच्या सादरीकरणाने लोकसंगीताचा रंग चढला. विद्यार्थ्यांच्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी उपस्थित वातावरण भारावून गेले. यावेळी वार्षिक क्रीडा स्पर्धेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.या स्नेहसंमेलनास संस्थेचे अध्यक्ष संतोष बाटे, प्राचार्या मनीषा बाटे, महेश चव्हाण, शिवाजी पोवार, जोतीराम पोर्लेकर, सरदार मुल्ला, सतीश रेडेकर, अतुल शिंदे, राजू सुतार, हरी पुजारी आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शिक्षक सीमा लोखंडे, प्रतीक्षा पाटील, पूनम बागी,सारिका काळे, कविता कश्यप, प्रियंका गळे,नयनतारा लंबे, उषा सनदे, रुचिता रावल, दीक्षा लोहार यांचे मोलाचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सीमा लोखंडे यांनी केले.