शिरोळ / प्रतिनिधी
अर्जुनवाड पंचायत समिती मतदारसंघाचा सर्वांगीण विकास साधून हा मतदारसंघ जिल्ह्यात एक आदर्श व ‘मॉडेल’ मतदारसंघ म्हणून उभा करण्याचा संकल्प सौ.सीमा म्हैशाळे यांनी व्यक्त केला आहे.मतदारसंघातील विविध गावांना भेटी देत नागरिकांशी संवाद साधताना त्यांनी आपल्या विकासात्मक भूमिका व धोरणांची सविस्तर मांडणी केली.शिक्षण,आरोग्य, पाणीपुरवठा,शेती तसेच इतर मूलभूत प्रश्न सोडवण्यासाठी आपण पूर्णपणे कटीबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.पंचायत समितीच्या माध्यमातून मिळणारा शंभर टक्के निधी हा मतदारसंघातील गावांच्या विकासासाठीच वापरण्यात येईल, स्वतःच्या घरासाठी पंचायत समितीचा एकही रुपया खर्च केला जाणार नाही, अशी ठाम ग्वाही त्यांनी दिली. मतदारसंघातील महिलांचा सन्मान राखून त्यांचे सक्षमीकरण करण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातील.महिलां व मुलींसाठी ‘सखी मंच’ची स्थापना करून त्यांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात येणार आहे.या मंचाच्या माध्यमातून महिलांच्या समस्या, आरोग्यविषयक प्रश्न, कायदेविषयक मार्गदर्शन व स्वावलंबनाच्या संधी निर्माण केल्या जातील.महिला,ज्येष्ठ नागरिक व मुलींच्या आरोग्य समस्यांसाठी आरोग्य विभागाच्या सहकार्याने नियमित आरोग्य शिबिरे आयोजित केली जातील.तसेच दिव्यांग बंधू-भगिनींना शासकीय योजना, उपचार व आवश्यक त्या सर्व मदतीसाठी विशेष लक्ष दिले जाईल, असेही त्यांनी सांगितले.शिक्षण क्षेत्रात गुणवत्तावाढीसाठी प्राथमिक व माध्यमिक शाळांचा दर्जा उंचावण्यावर भर देण्यात येणार आहे. दहावी, बारावी, स्पर्धा परीक्षा तसेच क्रीडा क्षेत्रात यश मिळवणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करून त्यांना प्रोत्साहन दिले जाईल. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व सहकार्य दिले जाईल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.शेती हा मतदारसंघाचा कणा असून शेतकऱ्यांच्या पाणी, वीज, पीकविमा व इतर प्रश्नांवर प्राधान्याने काम केले जाईल. सर्व समाजघटकांना समान न्याय देत पारदर्शक व लोकाभिमुख कारभार केला जाईल, असे मत सौ. सीमा म्हैशाळे यांनी मतदार भेटीदरम्यान व्यक्त केले.