पुलाची शिरोली प्रतिनिधी / कुबेर हंकारे
येथील रोहित पोपट संकपाळ आणि विक्रम पोपट संकपाळ या दोन सख्ख्या भावांनी इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन (IBPS) मार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे.या दोन्ही भावांची महाराष्ट्र बँकेत श्रेणी एक (ऑफिसर) पदासाठी निवड झाली असून,अशी कामगिरी करणारे ते गावातील पहिलेच सख्खे भाऊ ठरले आहेत.त्यांच्या या ऐतिहासिक यशामुळे पुलाची शिरोली गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.रोहित व विक्रम संकपाळ हे दोघेही लहानपणापासूनच अभ्यासू, मेहनती आणि शिस्तप्रिय म्हणून ओळखले जातात. बँकिंग क्षेत्रात अधिकारी होण्याचे स्वप्न त्यांनी सातत्यपूर्ण परिश्रम,कठोर अभ्यास आणि आत्मविश्वासाच्या बळावर साकार केले. स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करत असताना त्यांनी अनेक अडचणींवर मात करत आपले ध्येय स्पष्ट ठेवले.त्यांचे वडील पोपट संकपाळ हे राजाराम सहकारी साखर कारखाना येथे वित्त विभागात कार्यरत असून, त्यांनी मुलांच्या शिक्षणासाठी सदैव प्रोत्साहन दिले. आईचेही त्यांना मोलाचे मार्गदर्शन आणि पाठबळ लाभले. कुटुंबातील सकारात्मक वातावरण आणि शिक्षणाबद्दलची आस्था यामुळेच हे यश मिळाल्याचे मत ग्रामस्थ व्यक्त करत आहेत.या निवडीबद्दल गावातील ग्रामस्थ, शिक्षक, मित्रपरिवार तसेच विविध सामाजिक व शैक्षणिक संस्थांकडून रोहित व विक्रम यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. अनेक युवकांसाठी या दोन्ही भावांचे यश प्रेरणादायी ठरत असून, ग्रामीण भागातूनही राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धात्मक परीक्षेत यश मिळवता येते, हा विश्वास त्यांनी निर्माण केला आहे.रोहित आणि विक्रम संकपाळ यांच्या यशामुळे पुलाची शिरोली गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला असून, त्यांच्या पुढील कारकिर्दीसाठी सर्व स्तरातून शुभेच्छा दिल्या जात आहेत.