केपीटी चौक परिसरात ऊसाच्या कांड्यांवरून घसरून अनेक मोटरसायकल स्वार गंभीर जखमी, सुदैवाने जीवितहानी टळली 

Spread the love

शिरोळ / प्रतिनिधी 

शिरोळ – जयसिंगपूर मार्गावरील केपीटी चौक परिसरात ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर-ट्रॉलीतून रस्त्यावर सुमारे एक टनहून अधिक ऊसाच्या कांड्या पडल्याने गंभीर अपघात घडले आहेत.रस्त्यावर अचानक पडलेल्या ऊसाच्या कांड्यांमुळे अनेक मोटरसायकलस्वार घसरून पडले.सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही,परंतु अनेक जखमी  झाले आहेत.स्थानिक रहिवाशांनी आणि वाहनधारकांनी याबाबत संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत प्रशासन आणि संबंधित अधिकाऱ्यांकडून कठोर कारवाईची मागणी केली आहे.अशा घटनांना जबाबदारी कोण घेणार? उप प्रादेशिक कार्यालयाकडून प्रवासी वाहतुकीवर नियमित कारवाई होत असली तरी ओव्हरलोड ट्रॅक्टर-ट्रॉलीवर का लक्ष दिले जात नाही, हा मुद्दा नागरिक व वाहनधारक यांनी उपस्थित केला आहे.या घटनेमुळे फक्त वाहनधारकच नाही तर शेतकऱ्यांनाही आर्थिक तोटा सहन करावा लागला आहे.रात्रंदिवस कष्ट करून पिकवलेला ऊस रस्त्यावर टाकल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.नागरिक आणि स्थानिक शेतकरी यांनी या प्रकरणाकडे साखर कारखानदारांनी लक्ष द्यावे, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.स्थानिक पोलीस आणि प्रशासनाने अपघातानंतर त्वरित रस्त्यावरून ऊसाच्या कांड्या साफ करण्याची मागणी केली आहे, जेणेकरून आणखी अपघात टाळता येतील. जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.मोटरसायकल स्वारांनी प्रवास करताना अधिक सावधगिरी बाळगण्याचे आवाहन तानाजी पाटील यांनी केले आहे.तसेच,भविष्यात अशा अपघात टाळण्यासाठी प्रशासनाने कठोर उपाययोजना करण्याची मागणी देखील केली आहे.नागरिक, पोलीस, प्रशासन, शेतकरी आणि साखर कारखानदार यांच्या संयुक्त प्रयत्नांमुळेच भविष्यात रस्त्यावरून ऊस वाहतुकीत सुरक्षित करता येईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!