लोकप्रतिनिधी सत्कारात व्यस्त; नागरिक कचऱ्याच्या दुर्गंधीने त्रस्त – शिरोळ शहरात संतप्त प्रतिक्रिया

Spread the love

शिरोळ / प्रतिनिधी 

शहरात सध्या एकीकडे नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींचे सत्कार समारंभ सुरू असताना दुसरीकडे मात्र सर्वसामान्य नागरिक कचऱ्याच्या दुर्गंधीमुळे हैराण झाले आहेत.शिरोळ नगरपरिषदेच्या अनेक प्रभागांमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून कचरा उचलला जात नसल्याने दुर्गंधी पसरली असून नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.तत्कालीन राजर्षी शाहू विकास आघाडीच्या काळात घनकचरा व्यवस्थापन,अपुरा व अशुद्ध पाणीपुरवठा,स्वच्छता अशा मूलभूत नागरी समस्यांकडे सातत्याने दुर्लक्ष झाले.याच पार्श्वभूमीवर झालेल्या नगरपरिषद निवडणुकीत मतदारांनी बदलाचा कौल देत शिव-शाहू पुरस्कृत यादव पॅनेलला एकहाती सत्ता दिली.या सत्तांतराची अधिकृत घोषणा २१ डिसेंबर रोजी निकालानंतर झाली.मात्र त्यानंतरही अपेक्षित बदल अद्याप नागरिकांना अनुभवता आलेला नाही. नवीन सत्ताधाऱ्यांकडून तातडीने स्वच्छता, कचरा व्यवस्थापन आणि पाणीपुरवठा सुधारण्याची अपेक्षा असताना,बहुतांश लोकप्रतिनिधी सत्कार,अभिनंदन समारंभ आणि भेटीगाठींमध्ये व्यस्त असल्याचे चित्र आहे. परिणामी अनेक प्रभागांमध्ये कचऱ्याचे ढीग तसेच रस्त्यांच्या कडेला साचलेले कचऱ्याचे ढीग तस्सेच पडून आहेत.काही ठिकाणी तर कुजलेल्या कचऱ्यामुळे दुर्गंधी पसरून डास व माशांचा उपद्रव वाढला आहे.सत्ता बदलली, पण परिस्थिती मात्र जैसे थे आहे अशी प्रतिक्रिया अनेक नागरिक व्यक्त करत आहेत.नवीन सत्ताधाऱ्यांनी प्रथम शहरातील मूलभूत समस्या सोडवाव्यात,नंतर सत्कार स्वीकारावेत अशी मागणी जोर धरू लागली आहे.विशेषतः शालेय विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना या अस्वच्छतेचा अधिक त्रास सहन करावा लागत आहे.दरम्यान,नगरपरिषदेच्या प्रशासनाकडूनही कचरा उठाव व स्वच्छतेबाबत ठोस उपाययोजना होत नसल्याने नागरिकांचा रोष वाढत आहे. लवकरात लवकर कचरा उठाव नियमित करावा व शहर स्वच्छतेकडे लक्ष द्यावे अशी माफक अपेक्षा ज्येष्ठ नागरिकातून व्यक्त केली जात आहे.शिरोळ शहरातील ही स्थिती पाहता,नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींनी सत्कारापेक्षा शहराच्या आरोग्याला प्राधान्य देणे गरजेचे असल्याचे मत सर्वसामान्य नागरिक व्यक्त करत आहेत.

Leave a Comment

error: Content is protected !!