शिरोळ / प्रतिनिधी
दत्तनगर (शिरोळ) येथील कन्या विद्या मंदिरची विद्यार्थिनी कु.साक्षदा श्रीकांत माळकर हिने आपल्या वक्तृत्व व कथाकथन कौशल्याच्या जोरावर राज्य व जिल्हास्तरावर उल्लेखनीय यश संपादन केले आहे. सावळज (जि.सांगली) येथे प्राचार्य शं. कृ. उर्फ बापूसाहेब उनउने यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत उच्च बालगटात प्रथम क्रमांक पटकावून तिने शाळेच्या नावलौकिकात भर घातली आहे.या राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत राज्याच्या विविध भागांतून तब्बल ५० स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. कु. साक्षदा माळकर हिने “एक रोमांचकारी ऐतिहासिक प्रसंग” या विषयावर आपले विचार अत्यंत प्रभावी, ओघवत्या व आत्मविश्वासपूर्ण शैलीत मांडले. तिच्या सादरीकरणाने उपस्थित प्रेक्षक व परीक्षकांची मने जिंकली. या यशाबद्दल तिला रोख पारितोषिक, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. याशिवाय कु.साक्षदा माळकर हिने जिल्हा परिषद, सांस्कृतिक विभाग,कोल्हापूर यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कथाकथन स्पर्धेतही उज्वल यश मिळवले आहे. या स्पर्धेत तिने “हिरकणीची शौर्यकथा” प्रभावीपणे सादर करत तालुकास्तरावर प्रथम तर जिल्हास्तरावर द्वितीय क्रमांक पटकावला. तिच्या कथाकथनाने उपस्थितांकडून भरभरून दाद मिळाली. या यशाबद्दल जिल्हा परिषद कोल्हापूर यांच्या वतीने तिला ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.कु. साक्षदा माळकर हिला या यशासाठी कन्या विद्या मंदिर दत्तनगरच्या मुख्याध्यापिका संगीता घोरपडे, वर्गशिक्षक संजय मगदूम तसेच शिक्षक राजाराम सुतार, अस्मिता सुतार, किरण पाटील, दिलीप कोळी, जयश्री पेठकर आदी शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तिच्या या घवघवीत यशाबद्दल शालेय स्तरासह विविध क्षेत्रांतून तिचे अभिनंदन व कौतुक होत आहे.