शिरोळ / प्रतिनिधी
नगरपालिका निवडणुकांमध्ये राजकीय वारसा आणि योगायोग यांचा दुर्मीळ संगम क्वचितच पाहायला मिळतो.मात्र आष्टा व शिरोळ या दोन वेगवेगळ्या नगरपालिकांमध्ये एकाच वेळी मायलेकीने विजय मिळवत हा अनोखा योगायोग साधला आहे.आष्टा येथील माजी उपनगराध्यक्ष बाबासाहेब सिद्ध यांच्या पत्नी मंगल सिद्ध आणि मुलगी सविता बबन पुजारी यांच्या बाबतीत हा विशेष राजकीय योग जुळून आला आहे. नगरपालिका निवडणुकीत मंगल सिद्ध या आष्टा नगरपालिकेतून तर सविता बबन पुजारी या शिरोळ नगरपालिकेतून एकाच वेळी निवडून आल्या आहेत.मंगल सिद्ध यांनी आष्टा शहर विकास आघाडीतर्फे निवडणूक लढवली असून,तर सविता पुजारी यांनी शिरोळ येथील शिवशाहू यादव आघाडीतून आपला विजय निश्चित केला आहे.विशेष म्हणजे मायलेकी दोघीही प्रभाग क्रमांक ५ मधूनच निवडून आल्या असून हा योगायोग नागरिकांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे.सिद्ध व पुजारी कुटुंबात राजकीय वारशाची परंपरा दीर्घकाळापासून आहे. बाबासाहेब सिद्ध यांचे वडील दोन वेळा नगरसेवक होते. त्यानंतर मंगल सिद्ध या स्वतः दोन वेळा नगरसेवक म्हणून निवडून आल्या आहेत.आता मुलगी सविता पुजारी यांची पहिल्यांदाच नगरसेवक म्हणून निवड झाली आहे.वडील,आई आणि मुलगी यांच्या नगरसेवक पदाच्या संधींची एकूण बेरीज पाच होत असल्याने हा ही एक योगायोग म्हणून पाहिला जात आहे. शिरोळ नगरपालिकेच्या निवडणुकीत सविता पुजारी यांनी दणदणीत त्यांच्या या विजयामुळे शिरोळ शहरात समर्थक व कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.या विजयानंतर बबन पुजारी म्हणाले सांगितले की, २०२५ हे वर्ष आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरले आहे.पत्नी व सासुबाई दोघीही प्रभाग क्रमांक ५ मधूनच निवडून आल्या असून सिद्ध व पुजारी नगरसेवक पदाची संधी मिळाली आहे.मात्र हा निव्वळ योगायोग आहे.आष्टा मध्ये आमदार जयंत पाटील तसेच दिवंगत आमदार विलासराव शिंदे यांनी तर शिरोळ शहरात शिव- शाहु आघाडीचे प्रमुख गणपतराव पाटील,माजी खासदार राजू शेट्टी व पृथ्वीराजसिंह यादव यांनी उमेदवारी देऊन आम्हाला संधी दिली.आम्ही नेहमीच सर्वसामान्य माणसांची कामे प्रामाणिकपणे करत आलो असून कोणताही स्वार्थ साधलेला नाही. कोणतीही मोठी संस्था किंवा उद्योग नसतानाही मतदारांनी दिलेला पाठिंबा ही आमच्या कामाची पोहोच पावती आहे.एकाच वेळी पत्नी व सासुबाई निवडून आल्यामुळे पुजारी व सिद्ध दोन्ही कुटुंबांमध्ये आनंदाचे वातावरण असून हा विजय कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरत आहे.