कोल्हापूर – मुंबई अंगडिया बस लूटप्रकरणी ७ आरोपी जेरबंद; १ कोटी २२ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

Spread the love

कोल्हापूर / प्रतिनिधी

कोल्हापूरहून मुंबईकडे जाणाऱ्या अंगडिया बसवर मध्यरात्री कोयत्याचा धाक दाखवून तब्बल ६० किलो चांदी, १० ग्रॅम सोने व मशिनरीचे स्पेअर पार्ट असा सुमारे एक कोटी २२ लाख रुपयांचा मुद्देमाल लुटणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी मुख्य आरोपीसह सात जणांना ताब्यात घेण्यात आले असून लुटलेला संपूर्ण मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे.याबाबत तक्रारदार मछिंद्र नामदेव बोबडे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ते दशरथ शामराव बोबडे यांच्या मालकीच्या ‘न्यू अंगडिया सर्व्हिस’मध्ये कोल्हापूर–मुंबई पार्सल ने-आण करण्याचे काम करतात. दि. २२ डिसेंबर रोजी रात्री ११ वाजता ते अशोक ट्रॅव्हल्स बस क्र. एमएच ०९ जीजे ७२७२ मधून ६० किलो चांदी, १० ग्रॅम सोने व मशिनरी स्पेअर पार्ट अशी तीन पार्सले घेऊन मुंबईकडे निघाले होते. तावडे हॉटेल परिसरात तीन इसम बसमध्ये चढले. बस वाठार परिसरात आल्यानंतर हे इसम चालकाच्या केबिनमध्ये आले. त्यातील एकाने कोयता काढून क्लिनरच्या मानेवर धरत बस थांबवण्यास सांगितले. रात्री बाराच्या सुमारास बस किनी गावच्या हद्दीत थांबवण्यात आली. त्यानंतर फिर्यादी व क्लिनरला मारहाण करून बाहेर काढत, दुचाकीवर थांबलेल्या साथीदारांच्या मदतीने कोयत्याचा धाक दाखवून मुद्देमाल जबरदस्तीने पळवून नेण्यात आला.या घटनेप्रकरणी वडगाव पोलीस ठाण्यात २३ डिसेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता, अपर पोलीस अधीक्षक आण्णासाहेब जाधव व उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकुर यांनी घटनास्थळी भेट दिली. समांतर तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे सोपवण्यात आला.पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथके तयार करून कोल्हापूर बस स्थानकापासून किनीपर्यंतचे सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. गोपनीय माहितीनुसार विक्रम नगर, कोल्हापूर येथील अक्षय कदम हा या दरोड्याचा सूत्रधार असल्याचे निष्पन्न झाले. त्याला ताब्यात घेऊन चौकशी केल्यानंतर त्याच्या घरझडतीत संपूर्ण लुटलेला मुद्देमाल जप्त करण्यात आला.यानंतर टेंबलाई मंदिर परिसरात सापळा रचून जैद बशीर अफगाणी, अमन लियाकत सय्यद, सुजल प्रताप चौगुले, आदेश अरविंद कांबळे, अदिनाथ संतोष विपते व सैफू बशीर अफगाणी यांना ताब्यात घेण्यात आले. सर्व आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून पुढील तपास वडगाव पोलीस ठाण्यात सुरू आहे. प्राथमिक तपासात चैनीसाठी व कर्जबाजारीपणामुळे हा गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले आहे.ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने केली.

Leave a Comment

error: Content is protected !!