शिरोळ / प्रतिनिधी
शिरोळ नगर परिषदेच्या निवडणुकीचा निकाल नुकताच जाहीर झाला असून या निकालाने शिरोळ शहराच्या राजकारणात मोठी उलथापालथ घडवून आणली आहे.शिरोळ शहरात शिव शाहू पुरस्कृत यादव पॅनेलने जोरदार मुसंडी मारत नगराध्यक्ष पदासह तब्बल १५ नगरसेवक निवडून आणले असून शिरोळ नगर परिषदेवर एकहाती सत्ता मिळवली आहे. या घवघवीत विजयामुळे शहरात शिव शाहू आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून ठिकठिकाणी आनंदोत्सव साजरा करण्यात आला.गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत शिरोळ नगर परिषदेवर आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या नेतृत्वाखालील राजर्षी शाहू विकास आघाडीची सत्ता होती. मात्र या निवडणुकीत मतदारांनी स्पष्टपणे बदलाचा कौल दिला आहे.आमदार यड्रावकर आणि माजी नगराध्यक्ष अमरसिंह पाटील यांच्या आघाडीला मोठा पराभव पत्करावा लागला असून त्यांना केवळ तीन जागांवर समाधान मानावे लागले आहे.त्यामुळे शिरोळ नगर परिषदेवरील राजर्षी शाहू विकास आघाडीची सत्ता संपुष्टात आली आहे.या निवडणुकीत शिरोळ नगरपरिषद होण्यासाठी ज्यांनी आपल्या पदाचा राजकीय त्याग करून शिरोळ नगरपरिषद स्थापन करण्यास योगदान दिलेल्या शिव शाहू आघाडीच्या सौ.योगिता कांबळे या थेट जनतेतून नगराध्यक्ष म्हणून निवडून आल्या आहेत.त्यांच्या विजयाने शिव शाहू आघाडीचा आत्मविश्वास अधिक बळावला आहे. प्रचारादरम्यान त्यांनी विकास,पारदर्शक प्रशासन,नागरिकांच्या मूलभूत सुविधा आणि सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य देण्याचा मुद्दा ठळकपणे मांडला होता.त्याला मतदारांनी भरभरून प्रतिसाद दिल्याचे या निकालातून स्पष्ट झाले आहे.शिव शाहू आघाडीकडे स्पष्ट बहुमत असल्यामुळे आता उपनगराध्यक्ष पदासाठी राजकीय हालचालींना वेग आला आहे.उपनगराध्यक्ष पदासाठी कोणाची वर्णी लागणार,याकडे शिरोळ शहराचे लक्ष लागून राहिले आहे.सध्या या पदासाठी दोन नावांची जोरदार चर्चा शिरोळ शहरात सुरु आहे.त्यामध्ये संकपाळ कुटुंबातील सौ.अनिता गजानन संकपाळ आणि अनुभवी नेते विजय आरगे यांचा समावेश आहे.शिरोळ शहराच्या राजकारणात गेली ४१ वर्षे सक्रिय असलेल्या संकपाळ कुटुंबातील सौ.अनिता गजानन संकपाळ या सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात परिचित नाव आहे.कुटुंबातून मिळालेला राजकीय व सामाजिक दीर्घ काळाचा अनुभव, जनतेशी असलेली नाळ आणि संघटनात्मक ताकद यामुळे त्यांना उपनगराध्यक्ष पदाची संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्याचप्रमाणे शिरोळच्या राजकारणात सुमारे ३० वर्षे सक्रिय असलेले विजय आरगे हेही उपनगराध्यक्ष पदाचे प्रबळ दावेदार मानले जात आहेत.त्यांचा व्यापक जनसंपर्क आणि अनुभव लक्षात घेता त्यांच्या नावाचीही जोरदार चर्चा सुरू आहे.दरम्यान,शिव शाहू आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठका सुरू असून लवकरच उपनगराध्यक्ष पदाबाबत अंतिम निर्णय जाहीर होण्याची शक्यता आहे.एकूणच या निवडणुकीच्या निकालामुळे शिरोळ शहराच्या राजकारणाला नवी दिशा मिळाली असून येत्या काळात शिव शाहू आघाडीकडून विकासाभिमुख,पारदर्शक आणि लोकाभिमुख कारभाराची अपेक्षा शिरोळकर नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.