तरुणाईची साथ आणि मतदारांचा विश्वास; प्रभाग ७ मधून शरद उर्फ बापू मोरे यांचा दणदणीत विजय

Spread the love

शिरोळ / प्रतिनिधी 

शिरोळ नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक ७ मधून शरद उर्फ बापू मोरे यांनी विजय मिळवत नगर परिषदेच्या सभागृहात प्रवेश केला आहे. तरुणाईची भक्कम साथ आणि मतदारांनी दाखवलेल्या विश्वासामुळे हा विजय शक्य झाला असून शिरोळ शहरात त्यांच्या समर्थकांकडून जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळाले.मागील पंचवार्षिक निवडणुकीत शरद मोरे यांना अल्पमतात पराभव पत्करावा लागला होता. मात्र त्या पराभवाने खचून न जाता त्यांनी पुन्हा नव्या जोमाने सामाजिक कार्याला सुरुवात केली.नागरिकांशी थेट संपर्क, युवकांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करणे आणि निस्वार्थ भावनेने केलेले काम यामुळे त्यांनी जनतेचा विश्वास पुन्हा मिळवला.शरद उर्फ बापू मोरे हे शिव शाहू पुरस्कृत यादव पॅनेलच्या वतीने प्रभाग ७ मधून निवडणूक लढवत होते.त्यांनी अनेक युवकांच्या हाताला काम देत त्यांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यास मदत केली.त्यांच्या या कार्यामुळे प्रभागातीलच नव्हे तर शिरोळ शहरातील इतर प्रभागांमधील युवकही त्यांच्या प्रचारात सक्रिय सहभागी झाले होते.रात्रंदिवस मेहनत घेत युवकांनी शरद मोरे यांचे सामाजिक कार्य आणि निस्वार्थ भावना प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचवण्याचे काम केले.निवडणूक निकालापूर्वीच शरद मोरे यांचा विजय निश्चित मानला जात होता.आज अधिकृत निकाल जाहीर होताच शिरोळ शहरात त्यांच्या समर्थकांनी फटाक्यांची आतषबाजी, गुलालाची उधळण करत डॉल्बीच्या ठेक्यावर आनंदोत्सव साजरा केला.शहरभर उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.निकालानंतर शरद मोरे यांनी छत्रपती संभाजी महाराज चौक येथे असलेल्या स्वर्गीय माजी आमदार दिनकरराव यादव यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी त्यांनी गेल्या दीड महिन्यांपासून आपल्या प्रभागात रात्रंदिवस परिश्रम घेऊन हा विजय मिळवून दिल्याबद्दल सर्व युवकांचे व मतदारांचे मनापासून आभार मानले. प्रभागातील नागरिकांनी आपल्यावर विश्वास ठेवून सेवा करण्याची संधी दिल्याचे सांगत, भविष्यातही प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रामाणिकपणे काम करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

Leave a Comment

error: Content is protected !!