उपविभागीय अधिकारी अमोल ठाकूर अवैध धंद्यांना आळा घालून कायद्याचा धाक निर्माण करणार का ? जयसिंगपूरकरांचा सवाल

Spread the love

जयसिंगपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंदे बोकाळले

जयसिंगपूर / प्रतिनिधी

जयसिंगपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत जुगार,मटका,हातभट्टी दारू तसेच गांज्याची विक्री उघडपणे सुरू असून,याकडे पोलिस प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा गंभीर आरोप नागरिकांकडून केला जात आहे.दिवसाढवळ्या हातभट्टी दारूच्या बाटल्या विकल्या जात असून,जुगार व मटक्याचे अड्डे खुलेआम सुरू आहेत.याचबरोबर गांज्याच्या पुड्याही सहज उपलब्ध होत असल्याने परिसरातील गुन्हेगारीला मोठ्या प्रमाणात खतपाणी मिळत आहे.या अवैध धंद्यांमुळे शहरात खून,भरदिवसा चाकू हल्ले यांसारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये वाढ झाल्याचे चित्र आहे.नागरिकांचे म्हणणे आहे की,हे सर्व प्रकार पोलिसांच्या माहितीत असूनही ठोस कारवाई होत नाही. कारवाईचा केवळ दिखावा केला जात असून,पकडले गेलेले आरोपी दुसऱ्याच दिवशी पुन्हा त्याच ठिकाणी धंदा सुरू करतात,हेच वास्तव असल्याचा आरोप होत आहे.पोलिस निरीक्षक सत्यवान हक्के यांनी पदभार स्वीकारल्यापासून गुन्हेगारी वाढली असून,पोलिसांचा धाक राहिलेला नाही,अशी भावना नागरिक व्यक्त करत आहेत.वेळेवर आणि कठोर कारवाई झाली,तर जयसिंगपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत तीन पानी,मटका,जुगार,दारू व गांज्याचे धंदे सहज बंद होऊ शकतात.मात्र, पोलिस प्रशासन खरंच यासाठी इच्छुक आहे का,असा सवाल उपस्थित केला जात आहे.हातभट्टी दारू,गुटखा आणि गांज्यामुळे शहरातील तरुणाईचे आयुष्य उद्ध्वस्त होत चालले आहे.व्यसनाधीनतेमुळे अनेक कुटुंबे संकटात सापडली असून,समाजाचे आरोग्य धोक्यात आले आहे.विशेष म्हणजे, जयसिंगपूर शहरात उपविभागीय कार्यालय असतानाही दररोज हातभट्टी दारूची खुलेआम विक्री सुरू आहे,परंतु कारवाई केवळ नावालाच होत असल्याचे चित्र आहे.शहरातील काही भागांत जुगार व मटक्याचे अड्डे,तर काही ठिकाणी हातभट्टी दारूची विक्री सर्रास सुरू आहे.पिशव्यांत व बाटल्यांत भरून ठेवलेली दारू दिवसरात्र विकली जात असून,त्यामुळे स्थानिक गुन्हेगारी वाढत असल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत.काही गल्लीबोळ,चौक व पानपट्टीवर विशेष कोडवर गांज्याच्या पुड्या सहज मिळत असल्याने तरुण पिढी व्यसनाच्या आहारी जात आहे.पोलिसांनी जर खऱ्या अर्थाने धाडस दाखवले,तर एका दिवसात हे सर्व अवैध धंदे बंद होतील,अशी ठाम भूमिका नागरिक मांडत आहेत.त्यामुळे उपविभागीय अधिकारी अमोल ठाकूर व पोलिस निरीक्षक सत्यवान हक्के हे या अवैध धंद्यांवर कठोर कारवाई करून तरुण पिढीला व्यसनमुक्त करणार की पुन्हा तडजोडीच्या मार्गाने कारवाई दडपली जाणार,याकडे संपूर्ण जयसिंगपूर शहराचे लक्ष लागून राहिले आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!