पुलाची शिरोली प्रतिनिधी / कुबेर हंकारे
शिरोली औद्योगिक वसाहतीतील स्मॅक परिसरात लागलेल्या आगीत शेकडो झाडे जळून खाक झाली तर झाडांच्यासाठी पाणी पुरवठा करण्यासाठी लावण्यात आलेल्या ड्रीप पाईप जळाल्या आहेत या आगीत मोठे नुकसान झाले आहे.या आगीत पक्ष्यांच्या घरट्यांना झळ बसली असून यामध्ये पक्षांची घरटी जळून यात असणारी अंडी व पिल्ले मृत्यूमुखी पडली आहेत. यामुळे औद्योगिक वसाहतीतील हळहळ व्यक्त होत आहे.देशात व राज्यात पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी झाडे लावा झाडे जगवा हा संदेश घेऊन देशभरात मोठ्या प्रमाणात जनजागृती करुन वृक्षारोपणाची मोहीम हाती घेण्यात आली होती. या मोहिमेला गती देऊन शासकीय व विविध संस्थांचे वतीने मोठ्या प्रमाणात जनजागृती करुन वृक्षारोपण करण्यात आले होते. याचाच एक भाग म्हणून शिरोली औद्योगिक वसाहतीतील स्मॅक परिसरात स्मॅकच्या वतीने शेकडो झाडे लावण्यात आली होती. या झाडांना पाणी पुरवठा करण्यासाठी विशेष योजना सुरू करून ड्रिपद्वारे ठिबक सिंचनाद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. यासाठी झाडे, पाणी व्यवस्थापन तसेच माळी यांच्या साठी लाखो रूपयांच्या खर्च करण्यात आला होता. पण स्मॅकच्या जवळ शिरोली गावातून निघणार्या कचरा डेपो ग्रामपंचायतीने केला आहे. या ठिकाणी कचऱ्याला लागलेल्या ( लावण्यात आलेले) आग जवळच असलेल्या स्मॅकच्या परीसराला लागली या आगीने रौद्ररूप धारण करून स्मॅकच्या वतीने लावलेल्या झाडांना वेढले . यामध्ये शेकडो लहान मोठी झाडे, झाडांना पाणी पुरवठा करण्यासाठी लावण्यात आलेले लहान मोठे ड्रीप पाईप लाईन आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. यामुळे लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे. याशिवाय या आगीत पक्ष्यांच्या घरट्यांना झळ बसली. या घरट्यातील पक्ष्यांची अंडी व पिल्ले मृत्यूमुखी पडली आहेत.. यामुळे औद्योगिक वसाहतीतील हळहळ व्यक्त होत आहे. या ठिकाणी असलेला कचऱा डेपो तात्काळ हटवावा अशी मागणी करण्यात येत आहे.शिरोलीतील घनकचरा प्रकल्पासाठी वीट भट्टीच्या माळावरील चार गुंठे जागा जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने मंजूर झाली आहे. हा प्रकल्प तत्काळ सुरू करण्यासाठी २७ लाखांच्या कामाची निविदा ही निघाली आहे. तसेच हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होण्यासाठी व भविष्यातील कचऱ्याचा विचार करता आणखीन सहा गुंठे जागेची आवश्यकता आहे. याबाबत जिल्हाधिकारी यांचे कडे उर्वरित जागेची मागणी करणार असल्याची माहिती ग्रामपंचायत अधिकारी सौ. गिता कोळी यांनी दिली.