शिरोळ / प्रतिनिधी
शिरोळ नगर परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिरोळ प्रभाग क्रमांक ९ मध्ये मोठे राजकीय परिवर्तन घडण्याची चिन्हे स्पष्टपणे दिसू लागली आहेत.युवा वर्ग एकसंघ होत असल्याचे चित्र सध्या प्रभागात पाहायला मिळत असून हा युवाशक्तीचा मजबूत कल पद्मसिंह पाटील यांच्या बाजूने झुकताना दिसतो आहे.शिव शाहू यादव पॅनेलचे प्रमुख पृथ्वीराजसिंह यादव यांच्या नेतृत्वाखाली शिरोळ शहरातील सर्वच प्रभागातील युवक मोठ्या प्रमाणात एकत्र आले आहेत.यावर्षी ‘परिवर्तन घडणार’ असा संदेश युवकांकडून व्हॉट्सअॅप आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून जोरदारपणे फिरवला जात आहे.त्यामुळे प्रभाग क्रमांक ९ मधील राजकीय समीकरणे रंगतदार बनत असून निवडणूक चुरशीची होण्याची शक्यता अधिक बळकट झाली आहे.स्वभावाने शांत,संयमी आणि स्मितहास्य कायम चेहऱ्यावर असलेल्या पद्मसिंह पाटील यांची लोकांतील काम करण्याची शैली तरुणांना विशेष भावत आहे. सर्व युवकांना एकत्र घेऊन जाण्याची त्यांची हातोटी आणि संवादकौशल्यामुळे त्यांच्याभोवती समर्थकांची ताकद दिवसेंदिवस वाढत आहे.त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक ९ मधून युवा वर्गाला मोठी संधी मिळेल, असा सूर स्थानिकांमध्ये ऐकू येतो.याचबरोबर पंचगंगा सहकारी साखर कारखान्याचे संचालक प्रताप उर्फ बाबा पाटील यांच्या राजकीय अनुभवाचा लाभही पॅनेलला मिळत असल्याचे दिसते.ज्येष्ठ मतदारांमध्ये त्यांचा प्रभाव असून अनेक वयोवृद्ध कार्यकर्ते बाबा पाटील यांच्या सूचनेनुसार पॅनेलला सक्रीय पाठींबा देताना दिसत आहेत. त्यामुळे तरुणांच्या जोडीला अनुभवी नेतृत्वाची ताकद मिळाल्याने या पॅनेलची स्थिती अधिक मजबूत होत आहे.
आजवर शांत असलेल्या या प्रभागात आता राजकीय हालचालींना वेग आला असून युवा शक्ती आणि अनुभवी नेतृत्व यांच्या संयोगामुळे प्रभाग क्रमांक ९ मधील निवडणूक विशेष लक्षवेधी ठरणार आहे.पुढील दोन दिवसांत प्रचाराला अधिक वेग येईल आणि राजकीय चित्र आणखी स्पष्ट होईल,अशी शक्यता वर्तवली जात आहे.