दसरा चौकातील धूर व भटक्या कुत्र्यांच्या प्रश्नांवर सत्ताधारी आणि विरोधक यांची ‘गांधारीची भूमिका’ – कृष्णा देशमुख यांचा घणाघात 

Spread the love

शिरोळ / प्रतिनिधी 

प्रभाग क्रमांक १० मधील दसरा चौक परिसरातील वाढता कचऱ्यातील प्रदूषित धूर,भटक्या कुत्र्यांचा त्रास आणि त्यातून उद्भवणारे आरोग्याचे प्रश्न यामुळे नागरिक गेली अनेक वर्षे त्रस्त आहेत.अनेक वेळा स्थानिक प्रशासन, सत्ताधारी आणि विरोधक यांना निवेदने देऊनही समस्या सोडवण्याच्या दिशेने कोणतीही ठोस कारवाई न झाल्याचा आरोप येथील रहिवाशांकडून केला जात आहे.धूर आणि दुर्गंधीमुळे श्वसनाचे तसेच इतर आजारांचे प्रमाण वाढत असून ज्येष्ठ नागरिक,लहान मुले आणि महिलांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.नागरिकांच्या या वेदनेला आवाज देत प्रभाग क्रमांक १० मधून अपक्ष उमेदवार म्हणून उभे राहिलेले कृष्णा देशमुख यांनी सत्ताधारी आणि विरोधक ‘गांधारीची भूमिका’ घेत असल्याचा आरोप केला आहे.येथील जनतेचा जीव धोक्यात असताना केवळ आश्वासने आणि बैठकांपुरतेच काम मर्यादित राहिले आहे.प्रत्यक्ष कृती शून्य आहे,अशी कठोर टीका देशमुख यांनी केली.अनेक वर्षे दुर्लक्षित राहिलेल्या या प्रश्नांवर यंदा मतदारांनीच उत्तर द्यावे,असे आवाहन त्यांनी मतदारांशी संवाद साधताना केले. प्रभागातील वाढत्या समस्या स्थानिक सभागृहात ठामपणे मांडून त्यांची सोडवणूक करण्याची पूर्ण जबाबदारी घेण्याचे आश्वासन देशमुख यांनी यावेळी दिले.त्यांनी पुढे सांगितले की,मला एकदा प्रभागाची सेवा करण्याची संधी द्या.नागरिकांच्या आरोग्याशी,सुरक्षेशी आणि दैनंदिन जगण्याशी संबंधित कोणतीही समस्या प्रलंबित ठेवणार नाही.दसरा चौकाचा प्रश्न हा माझा पहिला प्राधान्यक्रम असेल असे आश्वासन कृष्णा देशमुख यांनी दसरा चौकातील नागरिकांना दिले आहे.दसरा चौकातील नागरिक वर्षे धुराच्या समस्या सोडवणाऱ्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील का? याकडे परिसरातील सर्वांचे लक्ष लागले आहे.आगामी निवडणुकीत मतदार कोणाचा विश्वास ठेवतात आणि परिस्थिती बदलण्यासाठी कोणाला संधी देतात,हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!